चार महिने काम रखडल्यानंतरही वेळेत पूर्ण होणार उड्डाणपूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 00:54 IST2018-08-22T00:52:46+5:302018-08-22T00:54:22+5:30
मानकापूर आरओबीचे बांधकाम वेळेपूर्वीच पूर्ण करणारे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) रेसिडेन्सी रोड उड्डाणपूल वेळेत पूर्ण करण्याचा दावा करीत आहे. पण हे बांधकाम चार महिने रखडले होते.

चार महिने काम रखडल्यानंतरही वेळेत पूर्ण होणार उड्डाणपूल
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मानकापूर आरओबीचे बांधकाम वेळेपूर्वीच पूर्ण करणारे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) रेसिडेन्सी रोड उड्डाणपूल वेळेत पूर्ण करण्याचा दावा करीत आहे. पण हे बांधकाम चार महिने रखडले होते.
उड्डाणपूल नासुप्र कार्यालयासमोरून सुरू होऊन छावणी चौक ते जुना काटोल नाका चौक आणि पागलखाना चौकापर्यंत तयार करण्यात येत आहे. एनएचएआयच्या सूत्रांनुसार पायलिंगचे काम पूर्ण झाले आहे. छावणी चौकाजवळ आणि पागलखाना चौकापर्यंत गर्डर टाकण्याचे काम सुरू आहे तर दुसरीकडे मानकापूर स्टेडियमसमोर पुलाच्या उतार भागाचे काम वेगात आहे. पण नासुप्रसमोर आणि सदर मुख्य रस्त्याच्या कामाची गती संथ आहे. सदर भागात पाण्याची पाईपलाईन व युटिलिटी शिफ्टिंग आणि डायव्हर्शन न मिळाल्यामुळे उड्डाणपुलाचे काम चार महिन्यांपासून रखडले आहे. सदर मुख्य रस्त्यावर पाईपलाईन शोधण्यात एनएचएआयला दीड महिना लागला.
पावसामुळे बंद असते बांधकाम
मोठ्या स्ट्रक्चर्सच्या उंच भागात सुरू असलेले काम पावसामुळे थांबवावे लागते. गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढल्यामुळे काम झाले नाही. याशिवाय शहराच्या व्यस्त भागात बांधकाम सुरू असल्यामुळे अनेक समस्या उभ्या राहिल्या आहेत. कामगारांना पिलरवर अनेक ठिकाणी वेल्डिंग करावी लागते. पण पावसामुळे काम थांबवावे लागते.
प्रयत्न सुरू आहेत
अनेक कारणांमुळे बांधकाम चार महिने रखडले. सध्या पायलिंगचे काम पूर्ण झाले आहे. पिलरचे काम ८० टक्के पूर्ण झाले आहे. सेगमेंट कास्टिंग प्रगतीवर आहे. पागलखाना चौकात ४५ मीटर लांब स्टील गर्डरची लॉन्चिंग करण्यात आली आहे. काटोल रोडवर सहा स्पॅन पूर्ण झाले आहेत. मार्च २०१९ पर्यंत काम पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे.
अभिजित जिचकार, प्रकल्प संचालक, एनएचएआय.