नागपुरातील वकिलांनाही हवी सवलतीच्या दरात विमा योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:08 IST2021-05-25T04:08:11+5:302021-05-25T04:08:11+5:30

नागपूर : सर्वोच्च न्यायालय वकील संघटनेप्रमाणे नागपुरातील उच्च न्यायालय वकील संघटना व जिल्हा वकील संघटना यांनीही सदस्यांना सवलतीच्या दरात ...

Advocates in Nagpur also want insurance scheme at a discounted rate | नागपुरातील वकिलांनाही हवी सवलतीच्या दरात विमा योजना

नागपुरातील वकिलांनाही हवी सवलतीच्या दरात विमा योजना

नागपूर : सर्वोच्च न्यायालय वकील संघटनेप्रमाणे नागपुरातील उच्च न्यायालय वकील संघटना व जिल्हा वकील संघटना यांनीही सदस्यांना सवलतीच्या दरात जीवन विमा योजना उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

कोरोना संक्रमणामुळे गेल्या काही महिन्यांत नागपुरातील ४० ते ५० वकिलांना प्राण गमवावे लागले. त्यापैकी काही वकिलांची आर्थिक परिस्थिती हलाखीची होती. परिणामी, संबंधित कुटुंबांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. अशी वेळ कोणत्याही वकिलाच्या कुटुंबावर येऊ नये याकरिता जीवन विमा अत्यंत आवश्यक आहे. सर्वोच्च न्यायालय वकील संघटनेने सदर बाब लक्षात घेता सदस्यांना सवलतीच्या दरात जीवन विमा योजना उपलब्ध करून दिली आहे. यासंदर्भात नागपुरातील काही ज्येष्ठ वकिलांशी संपर्क साधला असता, त्यांनी उच्च न्यायालय वकील संघटना व जिल्हा वकील संघटना यांनीही अशी योजना आणणे आवश्यक असल्याचे सांगितले.

अ‍ॅड. शशिभूषण वहाणे यांनी कोरोनाकाळात वकिलांच्या कुटुंबीयांना सुरक्षा कवच मिळणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. लॉकडाऊनमुळे अनेक वकिलांची आर्थिक परिस्थिती खराब झाली आहे. त्यांच्या पश्चात कुटुंबीयांची आबळ होणे निश्चित आहे. करिता, संघटनांनी विमा योजनेवर तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

अ‍ॅड. शैलेश नारनवरे व अ‍ॅड. श्रीरंग भांडारकर यांनीही जीवन विमा योजनेच्या मागणीचे समर्थन केले. सदस्यांना फार आधीच सवलतीच्या दरात विमा योजना उपलब्ध करून देणे आवश्यक होते. परंतु, आताही वेळ गेली नाही. याविषयी तातडीने निर्णय घेऊन चूक सुधारली जाऊ शकते. संघटनांनी सदस्यांची चिंता करावी व त्यांच्या हितासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करावे, असेही नारनवरे व भांडारकर यांनी सांगितले.

---------------

कंपन्यांसोबत चर्चा सुरू आहे

वकिलांना चांगली जीवन विमा योजना उपलब्ध करून देण्यासाठी कंपन्यांसोबत चर्चा सुरू आहे. कंपन्यांकडून समाधानकारक प्रस्ताव येण्याची प्रतीक्षा आहे. त्यानंतरच लगेच आवश्यक निर्णय घेतला जाईल.

----- अ‍ॅड. प्रफुल्ल खुबाळकर, सचिव, उच्च न्यायालय वकील संघटना

-------------

गरजू वकिलांना लाभ देऊ

दोन लाख रुपयांपर्यंत आर्थिक उत्पन्न असलेल्या वकिलांना ५० टक्के सवलतीच्या दरात जीवन विमा योजना उपलब्ध करून देण्याचा विचार आहे. त्यावर काम केले जात आहे. कंपन्यांशी चर्चा झाली आहे.

----- अ‍ॅड. कमल सतुजा, अध्यक्ष, जिल्हा वकील संघटना

Web Title: Advocates in Nagpur also want insurance scheme at a discounted rate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.