दिव्यांगांसाठी अत्याधुनिक केंद्र
By Admin | Updated: June 5, 2017 02:12 IST2017-06-05T02:12:44+5:302017-06-05T02:12:44+5:30
दिव्यांग व्यक्तींना विकासाची संधी देणे ही सर्वांचीच जबाबदारी आहे. दिव्यांगांच्या प्रगतीसाठी शासन कटिबद्ध असून नागपूर शहरात त्यांच्यासाठी राष्ट्रीय केंद्र सुरू करण्यात आले ही आनंदाची बाब आहे.

दिव्यांगांसाठी अत्याधुनिक केंद्र
थावरचंद गेहलोत : दिव्यांग व्यक्तींच्या संमिश्र प्रादेशिक केंद्राचे भूमिपूजन
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दिव्यांग व्यक्तींना विकासाची संधी देणे ही सर्वांचीच जबाबदारी आहे. दिव्यांगांच्या प्रगतीसाठी शासन कटिबद्ध असून नागपूर शहरात त्यांच्यासाठी राष्ट्रीय केंद्र सुरू करण्यात आले ही आनंदाची बाब आहे. दिव्यांगांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्व सोयीसुविधा असलेले अत्याधुनिक केंद्र उभारण्यात येईल, असे आश्वासन केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गेहलोत यांनी दिले. दिव्यांग व्यक्तींच्या संमिश्र प्रादेशिक केंद्राचा भूमिपूजन सोहळा रविवारी सकाळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय परिसरातील ‘टीबी वॉर्ड’ येथे पार पडला. यावेळी ते बोलत होते.
यावेळी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणीमंत्री नितीन गडकरी, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, खा. डॉ.विकास महात्मे, आ. सुधाकर देशमुख प्रामुख्याने उपस्थित होते. दिव्यांग व्यक्तींमधील गुणांची पारख होऊन त्यांच्या नेतृत्वाला वाव दिला पाहिजे. ते स्वावलंबी व्हावेत, तसेच त्यांचे पुनर्वसन व्हावे हा या केंद्राचा उद्देश असेल. नागपुरातील राष्ट्रीय केंद्राला २०१६ मध्ये शासनाने मान्यता दिली होती. त्यासाठी ३० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असल्याचे गेहलोत यांनी सांगितले. या संमिश्र प्रादेशिक केंद्रात दिव्यांग व्यक्तींना आर्थिकदृष्ट्या स्वत:च्या पायावर उभे राहता यावे, यासाठी प्रशिक्षण दिले जाईल. पुनर्वसनासाठी कंपोजिट रिजनल सेंटरचा आराखडा तयार करण्यात आला आहे. देशात सात राष्ट्रीय केंद्र कार्यरत आहेत. त्यानंतर आठवे केंद्र नागपुरात सुरू होत आहे. दिव्यांग व्यक्तींकरिता आवश्यक विकासाच्या संसाधनांची निर्मिती करणे, पायाभूत सेवा सुविधा पुरविणे हा केंद्राचा मुख्य उद्देश आहे, अशी माहितीदेखील त्यांनी दिली.
या केंद्रात पुनर्वसन चिकित्सा, व्यवसाय प्रशिक्षण, वाचा श्रवण आणि संभाषण विशेष शिक्षण, बधिर, अंधत्व व्यक्तींना प्रशिक्षण, शारीरिक आणि भौतिक उपचार, प्रोस्थेटिक्स आणि आॅर्थोटिक्स, समुदाय आधारित पुनर्वसन, कृत्रिम अवयव आणि चलनवलन यंत्र, समुपदेशन व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. कार्यक्रमाला मनपाचे सत्तापक्ष नेता संदीप जोशी, पंडीत दीनदयाल उपाध्याय इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सचे संचालक डॉ. विरल कामदार, सामाजिक न्याय विभागाच्या सहसचिव डॉ. डॉली चक्रवर्ती, राष्ट्रीय बहुविकलांग व्यक्ती अधिकारिता संस्थान चेन्नईचे हिमांशू दास, कंपोजिट रिजनल सेंटरचे संचालक डॉ. गुरबक्ष जगोटा उपस्थित होते. याप्रसंगी दिव्यांग व्यक्तींच्या संमिश्र प्रादेशिक केंद्राच्या शिलान्यासाचे अनावरण करण्यात आले.