‘होम क्वारंटाइन’ रुग्णांपर्यंत प्रशासन व्यवस्था ‘नॉट रिचेबल’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:08 IST2021-04-10T04:08:21+5:302021-04-10T04:08:21+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शहरात वाढत असलेला कोरोना संक्रमणाचा प्रादुर्भाव, हॉस्पिटल्समध्ये निर्माण झालेला बेड्सचा तुटवडा आणि गृह विलगीकरणात ...

‘होम क्वारंटाइन’ रुग्णांपर्यंत प्रशासन व्यवस्था ‘नॉट रिचेबल’
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरात वाढत असलेला कोरोना संक्रमणाचा प्रादुर्भाव, हॉस्पिटल्समध्ये निर्माण झालेला बेड्सचा तुटवडा आणि गृह विलगीकरणात असलेल्या कोरोना संक्रमित रुग्णांपर्यंत प्रशासन व्यवस्था पोहोचत नसल्याने प्रशासनाच्या नियोजनाचे पितळ उघडे पडत आहे. ढिसाळ नियोजनामुळे अनेक रुग्ण धास्तावल्या अवस्थेत जगत असल्याचे दिसून येत आहे.
शहरात कोरोना संसर्गाचा वेग आटोक्यात येण्याची चिन्हे दिसत नाहीत. दररोज संक्रमित रुग्णांची संख्या विक्रमी आकडे ओलांडत आहे. हॉस्पिटल्स रुग्णांनी फुल्ल झाली आहेत. एका बेडवर दोन ते तीन संक्रमितांवर उपचार केले जात आहेत. असे असताना संक्रमणाची सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णाला गृह विलगीकरणात राहण्याचा सल्ला दिला जात आहे. विलगीकरणात असलेल्या रुग्णाला मनपाचे कर्मचारी व आरोग्य सेवक भेट देतील आणि औषधे उपलब्ध करून देतील, असेही सांगितले जात आहे. मात्र, बहुतांश गृहविलगीकरणातील रुग्णांपर्यंत ना कर्मचारी, ना आरोग्य सेवक ना औषधे पोहोचत असल्याचे दिसून येत आहे. महालातील एका रुग्णाचा रिपोर्ट पाच दिवसांपूर्वी पॉझिटिव्ह आला. त्या वेळी संबंधित मनपाच्या रुग्णालयातर्फे लक्षणे सौम्य असून, गृह विलगीकरणात राहण्याचा सल्ला देण्यात आला. औषधांची मागणी केली असता कर्मचारी व आरोग्य सेवक संध्याकाळपर्यंत तुमच्याकडे येतील आणि औषधे व मार्गदर्शन केले जाईल, असे सांगितले गेले. मात्र, पाच दिवस उलटूनही त्या रुग्णापर्यंत कोणीच पोहोचले नाही. अखेर त्या रुग्णाने खासगी डॉक्टरचा सल्ला घेतला व ऐपतीप्रमाणे औषधे मागवली आहेत. अशाच प्रकारच्या अनेक केसेस शहरात आहेत. सर्वसामान्य रुग्ण थोडाफार तरी खर्च करू शकतो. मात्र, ज्यांची ऐपत नाही अशा रुग्णांच्या जीवाशी हेळसांड प्रशासनाकडून केली जात असल्याचे उघड होत आहे. एका अर्थाने कोरोना संक्रमणाच्या वाढत्या तीव्रतेबरोबर प्रशासनाच्या व्यवस्थेचे तीनतेरा वाजल्याचे उघड झाले आहे.
...........