प्रशासन अलर्ट, नागपूर शहरातील गर्दीवर नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 12:24 PM2021-02-18T12:24:49+5:302021-02-18T12:25:11+5:30

Nagpur News गेल्या काही दिवसांत नागपूर शहरातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. मनपा प्रशासन अलर्ट झाले आहे.

Administration Alert, Nagpur City Crowd Watch |  प्रशासन अलर्ट, नागपूर शहरातील गर्दीवर नजर

 प्रशासन अलर्ट, नागपूर शहरातील गर्दीवर नजर

googlenewsNext
ठळक मुद्दे तीन-चार दिवसांत परिणाम दिसतील

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : अनलॉकमध्ये सर्व व्यवहार खुले झाले आहेत. पार्क, बाजार, लग्न समारंभ, कार्यक्रमात लोकांची गर्दी वाढली. दुसरीकडे अनेक जण मास्क, सॅनिटायजरचा वापर करीत नाहीत. सुरक्षित अंतर पाळत नसल्याने गेल्या काही दिवसांत नागपूर शहरातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. मनपा प्रशासन अलर्ट झाले आहे. वर्दळीच्या ठिकाणी होणाऱ्या गर्दीवर नजर ठेवली जात आहे. याचे तीन-चार दिवसांत चांगले परिणाम दिसतील, असा विश्वास मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी व्यक्त केला.

कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने राज्य सरकारने लागू केलेल्या कोरोनाबाबतच्या मार्गदर्शक सूचनांची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश मनपाची झोन कार्यालये, उपद्रव शोध पथके व संबंधित विभागांना देण्यात आले आहेत. लग्न समारंभामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ लागली आहे. या समारंभाच्या ठिकाणी गर्दीवर निर्बंध लावण्यात आले आहेत. आता २०० ऐवजी ५० लोकांनाच परवानगी दिली आहे. नियमांचे उल्लघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. दंडाच्या रकमेत ५ हजारांवरून १० ते ५० हजारांपर्यंत वाढ करण्यात आल्याची माहिती राधाकृष्णन बी. यांनी ‘लोकमत’ला दिली.

कोरोनाचा धोका वर्दळीच्या ठिकाणासोबतच निवासी भागातही निर्माण झाला आहे. याचा विचार करता कोरोनाला आळा घालण्यासाठी नागरिकांनी शासनाच्या दिशा-निर्देशांचे पालन करावे, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे.

चाचण्या वाढविणार

नागपुरात रुग्णसंख्या वाढत असली, तरी काळजी करण्याचे कारण नाही. मास्क न लावणाऱ्या नागरिकांविरुद्ध कारवाई सुरू आहे. नियमांचे उल्लघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई होत आहे. चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यावर भर दिला जात आहे. स्वत:साठी नागरिकांनी नियमांचे पालन करावे. नागरिकांनी सहकार्य केले तर याचे लवकरच चांगले परिणाम दिसतील, असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला.

मंगल कार्यालये, लॉनची तपासणी

मार्केट, पार्क, लग्न समारंभ, कार्यक्रमांना मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ लागली आहे. या समारंभाच्या ठिकाणी गर्दीवर निर्बंध लावण्यात आले आहेत. लग्न समारंभामध्ये सहभागी झालेल्या नागरिकांनी मास्क लावले आहेत की नाहीत, परवानगीच्या तुलनेत गर्दी अधिक आहे का, हे समारंभाच्या ठिकाणी जाऊन तपासले जात आहे. परवागीच्या तुलनेत अधिक लोकांची उपस्थिती असल्यास कारवाई केली जात असल्याचे आयुक्त राधाकृष्णन बी. म्हणाले.

Web Title: Administration Alert, Nagpur City Crowd Watch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.