काेराेनाकाळात नागपूरच्या लाेकसंख्यावाढीमध्ये भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:07 IST2021-07-11T04:07:52+5:302021-07-11T04:07:52+5:30
जागतिक लाेकसंख्या दिन विशेष अंकिता देशकर नागपूर : लाेकसंख्यावाढीला जन्मदर, मृत्युदर व स्थलांतरण कारणीभूत असते. काेराेनाकाळातील लाॅकडाऊनमुळे प्रजननाचा दर ...

काेराेनाकाळात नागपूरच्या लाेकसंख्यावाढीमध्ये भर
जागतिक लाेकसंख्या दिन विशेष
अंकिता देशकर
नागपूर : लाेकसंख्यावाढीला जन्मदर, मृत्युदर व स्थलांतरण कारणीभूत असते. काेराेनाकाळातील लाॅकडाऊनमुळे प्रजननाचा दर वाढला. या काळात आराेग्य सेवेसह कुटुंब नियाेजनाच्या सेवांचा लाभ नागरिकांना घेता आला नाही. त्यामुळे हा काळ लाेकसंख्यावाढीमध्ये भर घालणारा ठरल्याचे मत समाज विकासचे डाॅ. नितीन लता वामन यांनी व्यक्त केले. २०२१ च्या जनगणनेत याचे परिणाम दिसून येतील, असा दावाही त्यांनी ‘लाेकमत’शी बाेलताना केला.
मागील काही दशकांतील जनगणनेनुसार लाेकसंख्येच्या बाबतीत नागपूर शहर राज्यात तिसरे तर देशात १३ व्या क्रमांकावर आहे. २०११ च्या जनगणनेनुसार नागपूर शहराची लाेकसंख्या २५ लक्षाच्या घरात आहे. २०२१ च्या जनगणनेत ती २९ लक्ष ४० हजार ४८७ पर्यंत जाईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. १९५० मध्ये शहराची लाेकसंख्या ४ लाख ७२ हजार ८५९ हाेती. तेव्हापासून चढउतार हाेत लाेकसंख्येमध्ये सरासरी १.६३ टक्क्यांनी वाढ नाेंदविण्यात आली आहे. याबाबत डाॅ. वामन यांनी प्रकाश टाकला.
शिक्षणाचा दर अधिक असलेल्या भागात प्रजननाचा दर घटलेला दिसताे. शैक्षणिक स्तरासह जीवनशैली, चांगल्या आराेग्य सुविधा व विशिष्ट प्रकारच्या वैद्यकीय सुविधांचा स्तर वाढल्याने मृत्युदर झपाट्याने घटला आहे. मात्र जन्मदर कायम असल्याने लाेकसंख्यावाढ सातत्याने हाेत आहे. यावर्षी ‘काेराेनाचा प्रजननावर परिणाम’ या संकल्पनेतून जागतिक लाेकसंख्या दिन पाळला जात आहे. प्रजनन दर विचारात घेताना कुटुंब नियाेजनाच्या सेवा, त्यांची सहज उपलब्धता व तत्सम आराेग्य सुविधांसह सांस्कृतिक बाबीही परिणामकारक असतात. कुटुंबात महिलेचे स्थान व तिला मिळणाऱ्या महत्त्वावर प्रजनन नियंत्रणाची क्षमता ठरविता येते. महिलेचा शैक्षणिक विकास आणि सामाजिक-आर्थिक स्टेटसमुळे प्रजननाबाबत निर्णय घेण्यात महिलांची भूमिका महत्त्वाची ठरते.
काेराेना महामारीच्या काळात लागलेल्या लाॅकडाऊनमुळे प्रजननाचा दर वाढल्याचा दावा डाॅ. वामन यांनी केला. कुटुंब नियाेजनाच्या सेवा सहज उपलब्ध हाेऊ न शकल्याने परिणाम झाल्याचे ते म्हणाले. इतर देशांच्या तुलनेत भारताची लाेकसंख्या निश्चितच अधिक आहे आणि याचा परिणाम लसीकरणावर हाेत आहे, हेही तेवढेच सत्य आहे. अनेक केंद्रांवर लस उपलब्ध हाेऊ शकली नाही. प्रचंड लाेकसंख्येच्या मानाने लस उत्पादनाची क्षमता कमी आहे. लसीचे वितरणही महत्त्वाची बाब ठरते. काही राज्यांत प्रत्येकाच्या दारी लस उपलब्ध असून तेथे घेतली जात नाही व महाराष्ट्रासारख्या राज्यात लाेक लसीच्या प्रतीक्षेत आहेत.