लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : खासगी थर्मल पॉवर उत्पादक कंपनी अदानी पॉवर लिमिटेडने (एपीएल) विदर्भइंडस्ट्रीज पॉवर लिमिटेड (व्हीआयपीएल) या कंपनीच्या खरेदी व रिझोल्यूशन प्लॅनची अंमलबजावणी पूर्ण केली. हा व्यवहार एकूण ४ हजार कोटी रुपांत झाला.
व्हीआयपीएल हा नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी औद्योगिक क्षेत्रात ३०० मेगाव्हॅट क्षमतेचे कोळशावर चालणारे दोन थर्मल वीज प्रकल्प आहे. व्हीआयपीएल सध्या इन्सॉल्व्हन्सी आणि बँक्रप्सी कोड (आयबीसी) अंतर्गत कॉर्पोरेट इनसॉल्व्हन्सी रिझोल्यूशन प्रक्रियेत (सीआयआरपी) होती. १८ जून २०२५ रोजी नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलच्या (एनसीएलटी) मुंबई खंडपीठाने अदानी पॉवरच्या रिझोल्यूशन प्लॅनला मंजुरी दिली आणि ७ जुलैला योजनेची अंमलबजावणी झाली. या अधिग्रहणामुळे अदानी पॉवर लिमिटेडची कार्यरत वीज निर्मिती क्षमता १८,१५० मेगाव्हॅटवर पोहोचली आहे.
व्हीआयपीएलचे अधिग्रहण हे अडचणीत आलेल्या मालमत्तांचे पुनरुज्जीवन करून त्यातून मूल्य मिळविण्याच्या अदानी पॉवरच्या धोरणातील एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. देशाच्या शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी आम्ही विश्वासार्ह, परवडणारी आणि सातत्यपूर्ण वीज उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न सुरू ठेवू असे अदानी पॉवर लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. बी. ख्यालिया यांनी सांगितले.
अदानी पॉवर सध्या ब्राऊनफिल्ड आणि ग्रीनफिल्ड प्रकल्पांद्वारे आपल्या बेस लोड वीज निर्मिती पोर्टफोलिओचा विस्तार करत आहे. कंपनी सध्या मध्य प्रदेशातील सिंगरौली-महान, छत्तीसगडमधील रायपूर, रायगड आणि कोरबा तसेच राजस्थानमधील कवई येथे प्रत्येकी १,६०० मेगाव्हॅट क्षमतेचे सहा ब्राऊनफिल्ड अल्ट्रा-सुपरक्रिटिकल पॉवर प्रोजेक्ट्स उभारत आहे. सन २०३० पर्यंत ३०,६७० मेगाव्हॅट कार्यक्षमतेचा टप्पा गाठणार आहे.