कॉटन मार्केटच्या रस्त्यावरील फळ-भाजी विक्रेत्यांवर कारवाई ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:10 IST2021-02-13T04:10:28+5:302021-02-13T04:10:28+5:30
प्रतापनगर, छोटा ताजबाग, इंदोरा, विटा भट्टी चौकातून ५ ट्रक सामान जब्त लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मनपा अतिक्रमण विरोधी ...

कॉटन मार्केटच्या रस्त्यावरील फळ-भाजी विक्रेत्यांवर कारवाई ()
प्रतापनगर, छोटा ताजबाग, इंदोरा, विटा भट्टी चौकातून ५ ट्रक सामान जब्त
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मनपा अतिक्रमण विरोधी पथकाने शुक्रवारी कॉटन मार्केट रोडवरील फळ व भाजी विक्रेत्यांविरुद्ध कारवाई करीत ३ ट्रक सामान जप्त केले. या रोडवर भाजी व फळ विक्रेत्यांचे ठेले रस्त्यावरच उभे राहतात. तिथेच मेट्रोचे कामही सुरू आहे. यामुळे रस्त्यावरच वाहतूक जॅम होऊ लागते. या पार्श्वभूमीवर मनपा अतिक्रमण विरोधी पथकाने शुक्रवारी कारवाई करीत येथील अतिक्रमण हटविले. पथकाने मनपाच्या १३ नंबर नाक्यापासून कॉटन मार्केट चौक, आग्याराम देवी मंदिर चौक, मेडिकल चौक, बैद्यनाथ चौक आणि उंटखानापर्यंत ५२ अतिक्रमण हटविले. या दरम्यान अतिक्रमणधारकांकडून २५ हजार रुपयाचा दंडही वसूल करण्यात आला.
यासोबतच लक्ष्मीनगर झोन अंतर्गत माटे चौक ते आयटी पार्क चौक, सुभाषनगर चौक ते माटे चौक, प्रतापनगर चौक ते खामला चौक आणि आठ रस्ता चौकापर्यंत ४८ अतिक्रमण हटविले. या रोडवरील एक ट्रक सामान जप्त करण्यात आले. नेहरूनगर झोन अंतर्गत भांडे प्लाॅट चौक ते सक्करदरा तलाव, म्हाळगीनगर चौक ते अयोध्यानगर भाजी बाजार, छोटा ताजबागच्या फुटपाथवरील ६८ अतिक्रमण हटवण्यात आले.
सतरंजीपुरा झोन अंतर्गत विटा भट्टी चौक ते राणी दुर्गावती चौकापर्यंत अवैध होर्डिंग्ज व बॅनर हटवण्यात आले. येथून ६० अतिक्रमण हटवण्यात आले. आसीनगर झोन अंतर्गत भीम चौक ते बाराखोली, इंदोरा चौक येथील अवैध शेड हटवून एकूण ४२ अतिक्रमण हटवण्यात आले. येथून एक ट्रक सामान जप्त करून ५ हजार रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला.
ही कारवाई उपायुक्त महेश मोरोणे व प्रवर्तन निरीक्षक संजय कांबळे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.