नागपूर : बँकांचे कोट्यवधी रुपयांचे कर्ज बुडवून पसार झालेल्या विजय मल्ल्यासंबंधी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदामंत्री यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. जर विजय मल्ल्याने बेकायदेशीर काम केले असेल तर त्याच्यावर कारवाई व्हायलाच हवी. तशाप्रकारे कारवाई होतदेखील आहे, असे प्रतिपादन त्यांनी शुक्रवारी केले. ४० वर्षे नियमित हप्ता भरणारा मल्ल्या घोटाळेबाज कसा, असा सवाल गडकरी यांनी गुरुवारी उपस्थित केला होता. त्यानंतर वाद निर्माण झाला होता.यासंदर्भात गडकरी यांनी आपली भूमिका नागपुरात मांडली. विजय मल्ल्याबाबत मी जे वक्तव्य केले त्याचा विपर्यास करण्यात आला. मी दोन वेगवेगळ्या गोष्टी बोललो होतो. व्यवसायात चढउतार येत असतात. ४० वर्षे मल्ल्याचे बँकेत ‘प्राईम अकाऊंट’ होते. ४१ वर्षी ते ‘अकाऊंट’ बिघडले. व्यवसायात चढउतार आले म्हणजे घोटाळा झाला असे होत नाही. जर मल्ल्याने आर्थिक गैरव्यवहार केला असेल तर कारवाई करणे योग्यच आहे. कायदा व नियम तोडल्यावर जी कारवाई करायला हवी, तीच सरकार करत आहे. या कारवाईचे मीदेखील समर्थनच करतो, असे गडकरी म्हणाले.‘राफेल’च्या करारात कुठलाही घोटाळा झाला नसल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला असल्याने विरोधकांचा खोटेपणा उघड झाला आहे. ‘राफेल’बाबत सुरुवातीपासूनच खोटे बोलण्यात आले. मात्र आता सत्य समोर आल्यानंतर तरी विरोधक हा विषय बंद करतील ही अपेक्षा असल्याचे मतदेखील गडकरी यांनी व्यक्त केले.
मल्ल्या घोटाळेबाज कसा?; गडकरींनी केला 'त्या' विधानाचा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2018 21:13 IST
४० वर्षे मल्ल्याचे बँकेत ‘प्राईम अकाऊंट’ होते. ४१ वर्षी ते ‘अकाऊंट’ बिघडले. व्यवसायात चढउतार आले म्हणजे घोटाळा झाला असे होत नाही. जर मल्ल्याने आर्थिक गैरव्यवहार केला असेल तर कारवाई करणे योग्यच आहे.
मल्ल्या घोटाळेबाज कसा?; गडकरींनी केला 'त्या' विधानाचा खुलासा
ठळक मुद्देनितीन गडकरी : ‘राफेल’वरुन विरोधकांनी बोध घ्यावा