एफडीएची कारवाई : ४५ लाख रुपयांचे खोबरे, विलायची जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2019 00:53 IST2019-02-09T00:52:08+5:302019-02-09T00:53:24+5:30
विनापरवाना घाऊक व्यापार आणि निकृष्ट अन्नपदार्थांची विक्री करीत असल्याच्या माहितीच्या आधारे अन्न व औषध प्रशासन विभागाने (एफडीए) शुक्रवारी अमरावती रोड, वडधामना येथील जय बजरंगबली एन्टरप्राईजेस या वितरकाच्या गोडाऊनची तपासणी करून ४५ लाख ४३ हजार रुपयांचा साठा जप्त केला.

एफडीएची कारवाई : ४५ लाख रुपयांचे खोबरे, विलायची जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विनापरवाना घाऊक व्यापार आणि निकृष्ट अन्नपदार्थांची विक्री करीत असल्याच्या माहितीच्या आधारे अन्न व औषध प्रशासन विभागाने (एफडीए) शुक्रवारी अमरावती रोड, वडधामना येथील जय बजरंगबली एन्टरप्राईजेस या वितरकाच्या गोडाऊनची तपासणी करून ४५ लाख ४३ हजार रुपयांचा साठा जप्त केला.
रामकृपाल चंद्रभान सिंग असे पेढीचे मालक असून त्यांच्या गोडावूनमध्ये खोबरे (कोकोनट) आणि विलायची या अन्नपदार्थांचा साठा विक्रीसाठी साठविल्याचे आढळून आले. त्यांनी विक्रीसाठी अन्न व औषध प्रशासन विभागाचा परवाना घेतला आहे. भेसळयुक्त असल्याच्या संशयावरून ४१ लाख १४ हजार ११४ रुपये किमतीचे २३,९९८ किलो खोबरे आणि ४ लाख २९ हजार ३४० रुपये किमतीची १०४८ किलो विलायची असा एकूण ४५ लाख ४३ हजार ४५४ रुपये किमतीचा साठा कायद्यानुसार सिंग यांच्या गोडावूनमध्ये जप्त करून सीलबंद करण्यात आला. या साठ्यातून दोन नमुने विश्लेषणासाठी घेऊन प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. नमुन्यांचे विश्लेषण अहवाल प्राप्त झाल्यानंतरच अन्न व्यवसाय चालकावर अन्न सुरक्षा आणि मानके कायद्यातील तरतुदीनुसार पुढील कारवाई करण्यात येणार आहे.
ही कारवाई अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त (अन्न) शशिकांत केकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहायक आयुक्त (अन्न) मिलिंद देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली कार्यालयातील अन्न सुरक्षा अधिकारी (दक्षता) अभय देशपांडे, अन्न सुरक्षा अधिकारी किरण गेडाम आणि महेश चहांदे यांनी केली. जनआरोग्याचा विचार करता या प्रकारची धडक मोहीम यापुढेही सुरू राहणार आहे. विनापरवाना व्यवसाय करताना व्यापारी आढळल्यास अन्न सुरक्षा व मानके कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याचे केकरे यांनी म्हटले आहे.