आधार नोंदणीसाठी पैसे मागितल्यास कारवाई
By Admin | Updated: April 12, 2015 02:38 IST2015-04-12T02:38:23+5:302015-04-12T02:38:23+5:30
आधार कार्डची नोंदणी नि:शुल्क असताना काही केंद्रांवर यासाठी नागरिकांकडून पैसे मागितले जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

आधार नोंदणीसाठी पैसे मागितल्यास कारवाई
नागपूर : आधार कार्डची नोंदणी नि:शुल्क असताना काही केंद्रांवर यासाठी नागरिकांकडून पैसे मागितले जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. एजंटच्या माध्यमातून ही मागणी केली जात आहे. यासंदर्भात तक्रारी आल्यास त्याची चौकशी करून कारवाई करण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत.
रेशन कार्डपासून तर आता निवडणूक ओळखपत्राची सांगड आधार कार्डासोबत घालण्यात आली आहे. शासनाच्या विविध योजनांसाठीही या कार्डचा क्रमांक मागितला जातो. विविध बँकांमध्येही कार्ड क्रमांकाची नोंदणी आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात २५० पेक्षा जास्त केंद्रांवर आधार नोंदणी किटस् देण्यात आल्या असून तेथे नोंदणीचे काम सुरू आहे. काही ठिकाणी एजंटच्या माध्यमातून आधारसाठी पैसे मागण्यात येत असल्याच्या तक्रारी आहेत. यासाठी एजंट सक्रिय झाले आहेत. काही केंद्रांवर तर नोंदणी न करताच नागरिकांना परत पाठविले जात असल्याच्याही तक्रारी आहेत. दरम्यान, याची गंभीर दखल प्रशासने घेतली असून आधार नोंदणीसाठी पैसे घेताना कोणी आढळल्यास त्यावर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)
लक्ष्यपूर्तीला
असमन्वयाचा फटका
जिल्ह्यात आधार नोंदणी ९० टक्के झाली असून, हे प्रमाण १०० टक्के करण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे. त्यानुसार विविध अंगणवाडीत शिबिर घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र संबंधित विभागात समन्वय नसल्याने या कामाला गती मिळू शकली नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ३१ मार्चपर्यंत हे काम होणे अपेक्षित होते. मात्र आता जूनपर्यंत त्याला मुदतवाढ देण्यात आली आहे.