लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ :नागपूर येथून बेपत्ता झालेल्या एका अल्पवयीन मुलीवर यवतमाळात सातत्याने सामूहिक अत्याचार झाल्याचे उघडकीस आल्याने समाजमन सुन्न झाले आहे. या प्रकरणात पोलिसांनी यवतमाळातील तिघांना व नागपुरातील दोन आरोपींना अटक केली आहे.
यातील आरोपींमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. नागपूर येथील हुडकेश्वर पोलिस ठाण्यात अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल झाली होती. या प्रकरणात चौकशी सुरू असतानाच वाहतूक शाखेतील जमादार जितेंद्र खोब्रागडे यांना यवतमाळ येघील सेवानगर येथे एका मुलीला काही मुलांनी खोलीवर ठेवल्याची माहिती मिळाली. त्यावरून यवतमाळ शहर पोलिसांनी मुलीची सुटका करून तिला १७ जुलै रोजी हुडकेश्वर पोलिसांच्या ताब्यात दिले.
अल्पवयीन मुलीला १६ जुलै रोजी नागपूर येथून यवतमाळात आणले गेले. त्यानंतर तिला यवतमाळातील सेवानगर भागात एका खोलीत ठेवण्यात आले. तिच्यावर सातत्याने अत्याचार करण्यात आला. तिला गुंगीच्या गोळ्या देऊन हा अत्याचार झाल्याचे पोलिस तपासात पुढे आले आहे. मुलगी अल्पवयीन असल्याने हुडकेश्वर ठाणेदार ज्ञानेश्वर भेदोडकर यांच्या मार्गदर्शनात तपास केला जात आहे. हुडकेश्वर पोलिसांच्या पथकाने पीडितेच्या जबाबावरून नागपुरातील दोन तरुणांना अटक केली. त्यानंतर त्यांच्या संपर्कातील यवतमाळच्या सेवानगर परिसरातील तिघांना अटक केली. अटकेतील आरोपींची नावे सांगण्यास ठाणेदार भेदोडकर यांनी नकार दिला.
इन्स्टाग्रामवरून ओळखअल्पवयीन मुलीसोबत इन्स्टाग्रामवरून ओळख झाली. यातूनच ती यवतमाळातील मुलांच्या संपर्कात आली. तिला नागपुरातून यवतमाळात आणणारे कोण आहेत याचाही तपास आता पोलिस करीत आहेत. गुंगीच्या गोळ्या देऊन पीडितेला आरोपींनी मादनी शिवारातील एका शेतात नेऊन तिथेही तिच्यावर पाच जणांनी अत्याचार केला. यामध्ये शेतातील चौकीदारही सहभागी असल्याचे समजते. हे शेत नेमके कोणाचे आहे, चौकीदार कोण याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.