लॉकडाऊनच्या काळात मिळविली २५३ सन्मानपत्रे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:07 IST2021-04-11T04:07:29+5:302021-04-11T04:07:29+5:30
आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय वेबिनारमध्ये घेतला सहभाग : ५३ विद्यापीठांनी गौरविले नागपूर : मार्च महिन्यात नागपुरात कोरोना पोहचला. सरकारने संक्रमण ...

लॉकडाऊनच्या काळात मिळविली २५३ सन्मानपत्रे
आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय वेबिनारमध्ये घेतला सहभाग : ५३ विद्यापीठांनी गौरविले
नागपूर : मार्च महिन्यात नागपुरात कोरोना पोहचला. सरकारने संक्रमण टाळण्यासाठी तब्बल ३ महिन्यांचा लॉकडाऊन घोषित केला. लॉकडाऊनमध्ये घरात बसून काय करणार, असा प्रश्न अनेकांपुढे उभा ठाकला होता. पण काही कल्पक व्यक्तिमत्त्वांनी याचा अतिशय चांगला उपयोग करून घेतला. अशाच कल्पक व अभ्यासू व्यक्तींमध्ये नागपुरातील डॉ. बळवंत भोयर यांचा समावेश आहे. त्यांनी लॉकडाऊनच्या काळात ५३ विद्यापीठांचे, शासकीय संस्थांचे, केंद्र व राज्य सरकारच्या मान्यताप्राप्त संस्थांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय वेबिनारमध्ये सहभागी होत २५३ सन्मानपत्रे मिळविले.
त्यांना मिळालेल्या सन्मानपत्रांमध्ये ५३ विद्यापीठे, १५० महाविद्यालये व ५० मान्यताप्राप्त संस्थांचा समावेश आहे. काही वेबिनारमध्ये त्यांनी पेपर प्रेझेंटेशन केले. कुठे वक्ता, कुठे पाहुणे, मुख्य अतिथी व सहभागी प्रतिनिधी म्हणून वेबिनार गाजविले. या वेबिनारमध्ये मराठी साहित्य, कोरोना एक आव्हान, मराठी अध्यापनात नवतंत्रज्ञान, दलित स्त्रीचे आत्मकथन, मशिनी अनुवाद, गणित, विज्ञान, संशोधन आदी विषयांवर मार्गदर्शन केले. आपले अभिप्राय वेबिनारच्या माध्यमातून व्यक्त केले. डॉ. भोयर हे साहित्यिक म्हणून प्रसिद्ध आहे. त्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. ११ विषयांत त्यांनी पदविका मिळविली आहे. वक्ता, कवी, मुलाखतकार, कलावंत, योगशिक्षक अशा चौफेर अंगाने ते प्रसिद्ध आहेत.
लॉकडाऊन लागल्यानंतर डॉ. भोयरसुद्धा विचारात पडले होते, हा काळ कसा घालविणार. त्यांच्याकडे असलेल्या लायब्ररीतील ११ हजार पुस्तकांची यादी करीत असताना, ऑनलाईन सेमिनारमध्ये सहभागी होण्याचे आमंत्रण आले. हे वेबिनार माहितीचे आदानप्रदान करण्याचे माध्यम ठरू शकते, या भूमिकेतून ते विविध संस्थांच्या, विद्यापीठांच्या, महाविद्यालयांच्या वेबिनारमध्ये स्वत:हून सहभागी होऊ लागले. या वेबिनारमध्ये सहभागी झाल्याबद्दल प्रमाणपत्र देऊन त्यांना गौरविण्यात येऊ लागले. अशाप्रकारे लॉकडाऊनच्या काळात २५३ प्रमाणपत्रे मिळवून त्यांनी एक रेकॉर्डच केला.
- लॉकडाऊनचा काळ हा मला मिळालेली एक संधीच होती. अधिकाधिक ज्ञान कसे प्राप्त करता येईल, यासंदर्भात माझी सतत धडपड असते. आयुष्यात सर्वात मोठी श्रीमंती ही ज्ञानाची आहे. माझा छंद हा ज्ञान प्राप्त करणे व इतरांना मार्गदर्शन करणे आहे. त्यामुळे या सर्व उपक्रमात इतका व्यस्त होतो की लॉकडाऊनचा काळ कसा गेला कळलेच नाही.
डॉ. बळवंत भोयर, संशोधक व अभ्यासक