न्यायालय परिसरातच लपून बसला आरोपी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 23:34 IST2020-07-21T23:32:50+5:302020-07-21T23:34:57+5:30
एका प्रकरणात न्यायालयातून जामीन मिळाल्यानंतर पोलीस दुसऱ्या प्रकरणात अटक करणार असल्याची कल्पना आल्यामुळे गुन्हेगाराने न्यायालयाच्या परिसरातच लपून बसणे पसंत केले. मात्र रात्री ११ च्या सुमारास सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून त्याच्या हालचाली दिसल्यामुळे त्याला पोलिसांनी अटक केली.

न्यायालय परिसरातच लपून बसला आरोपी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एका प्रकरणात न्यायालयातून जामीन मिळाल्यानंतर पोलीस दुसऱ्या प्रकरणात अटक करणार असल्याची कल्पना आल्यामुळे गुन्हेगाराने न्यायालयाच्या परिसरातच लपून बसणे पसंत केले. मात्र रात्री ११ च्या सुमारास सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून त्याच्या हालचाली दिसल्यामुळे त्याला पोलिसांनी अटक केली.
सोमवारी रात्री ही नाट्यमय घटना घडली. योगेश ऊर्फ कल्लू रमेश शाहू (वय २८) असे आरोपीचे नाव आहे. दोन दिवसापूर्वी शाहूला वाठोडा पोलिसांनी एका चोरीच्या प्रकरणात अटक केली होती. सोमवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. त्याला जामीन मिळाला. गणेशपेठ पोलीस आपल्याला दुसऱ्या एका चोरीच्या प्रकरणात अटक करणार असल्याची माहिती मिळाल्यामुळे जामीन मिळाल्यानंतर योगेश न्यायालयातच लपून बसला. त्याला अटक करण्यासाठी आलेले गणेशपेठ पोलीस रात्री १० वाजेपर्यंत त्याची वाट बघत होते. न्यायालयाच्या संपूर्ण परिसरात त्याची शोधाशोध करण्यात आली. मात्र तो आढळला नाही.
दरम्यान, पाणी पिण्यासाठी तो सातव्या माळ्यावर जात असल्याचे रात्री ११ च्या सुमारास सीसीटीव्हीत दिसले. त्यामुळे न्यायालयात तैनात असलेल्या पोलिसांनी त्याला घेराव घालून ताब्यात घेतले.