डीजेवाल्याला मारहाण केल्याचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 01:20 IST2017-08-23T01:19:31+5:302017-08-23T01:20:15+5:30
मारबत बडग्याच्या मिरवणुकीत वाजणारा डीजे पाचपावली पोलिसांनी जप्त केला. डीजे मालक आणि सोबतच्या तरुणाला ठाण्यात आणले.

डीजेवाल्याला मारहाण केल्याचा आरोप
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मारबत बडग्याच्या मिरवणुकीत वाजणारा डीजे पाचपावली पोलिसांनी जप्त केला. डीजे मालक आणि सोबतच्या तरुणाला ठाण्यात आणले. त्यानंतर एका तरुणाला पोलिसांनी बेदम मारहाण केल्यामुळे तो बेशुद्ध पडल्याचा आरोप डीजे समर्थक तसेच मिरवणुकीतील तरुणांनी केला असून पोलिसांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. पाचपावली पोलिसांनी मात्र कारवाईमुळे डीजेवाले तथ्यहीन आरोप करीत असल्याचा प्रत्यारोप करून मारहाणीचा स्पष्ट शब्दात इन्कार केला.
नागपूर शहराचे वैभव मानले जाणारी मारबत बडग्याची मिरवणूक सकाळपासून शहरातील विविध भागातून निघाली. मिरवणुकीत डीजे वाजविला जात होता. पोलिसांनी डीजेला मनाई केल्याने अजनीतील रामेश्वरीसह ठिकठिकाणी मिरवणुकीचे आयोजक आणि पोलिसांमध्ये वाद झाले. तणावही निर्माण झाला. दुपारी ४ च्या सुमारास अशाच प्रकारे एक मिरवणूक पाचपावली ठाण्यासमोरून जात होती.
डीजेही वाजत होता. पाचपावली पोलिसांनी डीजे वाजविण्यास मनाई केली. त्याला दाद मिळाली नाही. त्यामुळे पोलिसांनी डीजे तसेच ते वाजविणाºया चार ते पाच जणांना पोलीस ठाण्यात आणले. तेथे बाचाबाचीही झाली अन् तणाव निर्माण झाला. अचानक शिवनंद अनिल वाघमारे हा तरुण बेशुद्ध पडला.
पोलिसांनी त्याला मारहाण केल्यामुळेच तो बेशुद्ध पडल्याने तणाव वाढला. त्याला त्याच्या सहकाºयांनी लगेच मेयोत नेले. तेथे त्याच्यावर उपचार करण्यात आले. त्याचवेळी अनिल नामक पोलीस उपनिरीक्षकांनी मेयोत शिवीगाळ करून एकाचा मोबाईल हिसकावून घेतल्याचा आरोप डीजेवाल्यांनी केला. ते कळताच विदर्भ बॅकस्टेज असोसिएशनचे अध्यक्ष संदीप बारस्कर आणि डीजे असोसिएशनचे पदाधिकारी मेयोत पोहचले.
त्यांनी मारहाण करून शिवीगाळ करणाºया पाचपावली पोलिसांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली. पोलिसांनी कारवाई करावी, मारहाण करण्याचा त्यांना अधिकार कुणी दिला, अशीही विचारणा केली. या घटनेमुळे रात्रीपर्यंत मेयोत तणाव होता.
तरुण बेशुद्ध : पोलिसांनी केला मारहाणीचा इन्कार
आम्ही त्याला बोटही लावले नाही
या संबंधाने पाचपावलीचे ठाणेदार नरेंद्र हिवरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मारहाण आणि शिवीगाळीचा इन्कार केला. फीट आल्यामुळे वाघमारे खाली पडल्याचे सांगून पोलिसांनी कांदा सुंगविल्यानंतर तो शुद्धीवर आला. नंतर त्याच्या मित्रांनी त्याला उचलून नेले, असे हिवरे म्हणाले. पोलीस ठाण्याच्या आवारात सीसीटीव्ही आहे. त्यामुळे मारहाणीच्या आरोपात तथ्य नाही. आम्ही त्याला मारहाण तर सोडा बोटही लावले नाही, असेही ते म्हणाले.