अपहरण अन् बलात्काराचा आरोप
By Admin | Updated: July 25, 2014 00:54 IST2014-07-25T00:54:08+5:302014-07-25T00:54:08+5:30
पाच जणांनी आपल्याला कारमधून कळमेश्वरजवळ नेले. तेथे पिस्तुलाचा धाक दाखवून एकाने बलात्कार केला तर, दुसऱ्याने मोबाईलमधून आक्षेपार्ह छायाचित्रण केले, असा खळबळजनक आरोप

अपहरण अन् बलात्काराचा आरोप
घटनेच्या सात दिवसानंतर तक्रार : पोलिसांची धावपळ
नागपूर : पाच जणांनी आपल्याला कारमधून कळमेश्वरजवळ नेले. तेथे पिस्तुलाचा धाक दाखवून एकाने बलात्कार केला तर, दुसऱ्याने मोबाईलमधून आक्षेपार्ह छायाचित्रण केले, असा खळबळजनक आरोप असलेली तक्रार एका महिलेने नंदनवन पोलिसांकडे नोंदवली.
मेधा (वय २८, नाव बदलवलेले) नामक ही महिला नंदनवनमध्ये भाड्याच्या घरात राहते. महिलेच्या तक्रारीनुसार, १४ जुलैच्या दुपारी २ वाजता अमित मुटकरे याने तिला नंदनवन ठाण्यात बयान द्यायला जाऊ, असे म्हणून कारमध्ये बसवले. त्याच्यासोबत त्याचा भाऊ अविनाश, सुयोग, विशाल आणि विजेंद्र होते. या पाच जणांनी कळमेश्वर फाट्याजवळ एका घरात नेले. तेथे पिस्तुलाचा धाक दाखवून अमितने बलात्कार केला अन् अविनाशने मोबाईलवरून या बलात्काराचे छायाचित्रण केले. यानंतर आरोपींनी आपल्याला सोडून दिले, असे मेधाने तक्रारीत नमूद केले आहे. विशेष म्हणजे, १४ जुलैच्या या घटनेची तक्रार मेधाने २१ जुलैला सायंकाळी नंदनवन ठाण्यात केली. सायंकाळची वेळ असल्याने आणि महिलांना पोलीस ठाण्यात सायंकाळी बसवून ठेवण्याची मनाई असल्याने पोलिसांनी २२ जुलैला या प्रकरणी अपहरण, बलात्कार, धमकी दिल्याच्या आरोपावरून गुन्हे दाखल केले. मात्र, पोलिसांच्या चौकशीनंतर मेधाने मेडिकल करून घेण्यास नकार दिला. तिने यापूर्वी अनेक ठाण्यात अनेकांविरुद्ध तक्रारी केल्याचे तपासात उघड झाले आहे. सक्करदऱ्यात जानेवारी महिन्यात मेधाने एकाविरुद्ध बलात्काराची तक्रार दिली होती. त्यामुळे पोलीस या प्रकरणातील तथ्य शोधून काढण्याच्या कामी लागले आहेत. (प्रतिनिधी)