वेकोलिच्या गोकुल खाण परिसरात शोक अधिकाऱ्यांचा अपघाती मृत्यू :
By Admin | Updated: June 13, 2017 01:56 IST2017-06-13T01:56:02+5:302017-06-13T01:56:02+5:30
भिवापूर तालुक्यातील वेकोलिच्या गोकुल खाण परिसरात क्रेनखाली दबल्याने दोन अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला.

वेकोलिच्या गोकुल खाण परिसरात शोक अधिकाऱ्यांचा अपघाती मृत्यू :
पार्थिव मध्य प्रदेश व पंजाबला रवाना
लोकमत न्यूज नेटवर्क
नांद : भिवापूर तालुक्यातील वेकोलिच्या गोकुल खाण परिसरात क्रेनखाली दबल्याने दोन अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली. मृतांमध्ये एक वेकोलिचे तर दुसऱ्या वेकोलिअंतर्गत कार्यरत असलेल्या खासगी कंपनीतील अधिकाऱ्याचा समावेश आहे. दोन्ही अधिकाऱ्यांचे पार्थिव उत्तरीय तपासणीनंतर रविवारी रात्री त्यांच्या मूळ गावी रवाना करण्यात आले. या घटनेमुळे गोकुल खाणीतील अधिकारी, कर्मचारी व कामगारांमध्ये शोकाकूल वातावरण होते.
इंद्रजित भैयालाल त्रिपाठी आणि जंगसिंग गिल अशी मृत अधिकाऱ्यांची नावे आहेत. त्रिपाठी हे वेकोलित खाण व्यवस्थापकपदी तर जंगसिंग हे करमजित कंपनीमध्ये सुपरवायझरपदी कार्यरत होते. गोकुल खाण परिसरात रविवारी सकाळी कोळसा वाहतुकीचा ट्रक दलदलीत फसल्याने तो काढण्यासाठी सायंकाळी क्रेन बोलावण्यात आली होती. या दोन्ही अधिकाऱ्यांच्या देखरेखीत ट्रक काढण्याचे कार्य सुरू होते. दरम्यान, क्रेनचा रोप तुटला आणि जोराच्या झटक्याने क्रेन उलटली. दोन्ही अधिकारी या क्रेनखाली दबल्याने गंभीर जखमी झाले. त्यांना लगेच बाहेर काढून उमरेडला हलविण्यात आले, मात्र वाटेतच दोघांचीही प्राणज्योत मालवली.
उमरेड येथील ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी आटोपल्यानंतर इंद्रजित त्रिपाठी यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी मध्य प्रदेशातील सतना येथे आणि जंग सिंग यांचे पार्थिव पंजाबमधील त्यांच्या मूळ गावी रवाना करण्यात आले. दरम्यान, सोमवारी सकाळी गोकुल खाणीच्या कार्यालयात वेकोलिचे तांत्रिक निदेशक टी. एन. झा, उषा प्रतापन यांच्या उपस्थितीत शोकसभा घेण्यात आली. त्यात दोन्ही अधिकाऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्रिपाठी यांच्या मुलीचे लग्न जुळले असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. शोकसभेला गोकुल खाणीचे अधिकारी, कर्मचारी व कामगार उपस्थित होते.