हळदीच्या कार्यक्रमाहून परतताना अपघात, पतीचा मृत्यू, पत्नी अन् मुले जखमी
By दयानंद पाईकराव | Updated: February 17, 2024 23:22 IST2024-02-17T23:21:38+5:302024-02-17T23:22:09+5:30
ही घटना कोराडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी १६ फेब्रुवारीला रात्री ११.३० वाजताच्या सुमारास घडली.

हळदीच्या कार्यक्रमाहून परतताना अपघात, पतीचा मृत्यू, पत्नी अन् मुले जखमी
नागपूर : नातेवाईकाकडे हळदीच्या कार्यक्रमाला गेल्यानंतर घरी परतताना भरधाव दुचाकीने धडक दिल्यामुळे पतीचा मृत्यू झाला. तर पत्नी व दोन मुले जखमी झाले. ही घटना कोराडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी १६ फेब्रुवारीला रात्री ११.३० वाजताच्या सुमारास घडली.
नितीन बडीराम जुवारे (३९, रा. आंबेडकरनगर, रविवार बाजार चौक, महादुला कोराडी) असे या अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ते नांदा कोराडी येथे पत्नी आणि दोन मुलांसह नातेवाईकांकडे हळदीच्या कार्यक्रमाला गेले होते. हळदीचा कार्यक्रम आटोपून ते आपली दुचाकी क्रमांक एम. एच. ४०, ए. वाय-०८२० ने पत्नी व मुलांसह घरी परत जात होते. तेवढ्यात कोराडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत कोराडी तलाव सर्व्हिस रोडच्या पुलाजवळ दुचाकी क्रमांक एम. एच. ४०, बी. झेड-३१७३ च्या ट्रिपलसीट असलेल्या चालकाने आपल्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवून नितीन यांच्या दुचाकीला समोरुन जोरात धडक दिली.
यात नितीन यांच्या डोक्याला व कानाला मार लागला. तसेच त्यांची पत्नी व मुले किरकोळ जखमी झाले. अपघातानंतर आरोपी दुचाकीचालक सावनेरकडे पळून गेले. नितीन यांच्या ओळखीचे असलेले त्यांचे मित्र निलेश राजेंद्र मेश्राम (३०, रा. श्रीवासनगर कोराडी) यांनी नितीन यांना खासगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी मेश्राम यांनी दिलेल्या तक्रारीवरून कोराडी ठाण्याचे उपनिरीक्षक साईप्रसाद केंद्रे यांनी आरोपी दुचाकीचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरु केला आहे.