Accident case accused school van driver vanished from police station | अपघात करणारा आरोपी स्कूल व्हॅन चालक पोलीस ठाण्यातून बेपता
अपघात करणारा आरोपी स्कूल व्हॅन चालक पोलीस ठाण्यातून बेपता

ठळक मुद्देदुसऱ्याच व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल : नागपुरातील खरबी चौकाजवळ अपघात

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अनियंत्रित स्कूल व्हॅन चालवून तिघांना धडक देणारा आरोपी चालक पोलीस ठाण्यातून गायब झाला आणि त्याच्याऐवजी दुसऱ्याच व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. जखमीच्या कुटुंबीयांनी केलेल्या या आरोपामुळे पोलीस विभाग हादरला आहे. आरोप करणाऱ्यांनी दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हिवरीनगर येथील रहिवासी सूर्यकांत मधुकर मेहर (३५) हे कन्स्ट्रक्शनचे काम करतात. सकाळी त्यांच्या एका साईटवर भूमिपूजनाचा कार्यक्रम होता. त्यासाठी ते दुचाकीने नाश्ता घेण्यासाठी निघाले. त्यांच्यासोबत दोन वर्षाची मुलगी निहारिका आणि चुलत भाऊ राहुल पालीवाल होते. खरबी चौकाजवळ एम.एच. ४९ जे ०८१७ च्या चालकाने सूर्यकांत यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात दुचाकीवरील तिघेही जखमी झाले. दरम्यान, नागरिकांच्या मदतीने व्हॅन चालकाला पकडण्यात आले. त्याला घेऊन ते नंदनवन पोलीस ठाण्यात आले. दुसरीकडे जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. थोड्या वेळानंतर जखमीचे कुटुंबीय ठाण्यात पोहोचले. तेव्हा आरोपी व्हॅन चालकास जामीन देण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. परंतु जेव्हा पोलिसांच्या दस्तावेजावर लागलेला आरोपीचा फोटो नातेवाईकांनी पाहिला तेव्हा त्यांना धक्का बसला. कारण त्यांचे म्हणणे होते की, ज्याच्या हातून अपघात झाला तो फोटोमधील व्यक्ती नाही. ज्याचा फोटो आहे, त्याचा वाहन परवना असल्याचे दर्शविण्यात आले आहे. परंतु अपघात करणाऱ्या चालकाकडे वाहन परवानाच नव्हता. यावर जखमींच्या कुटुंबीयांना ठाणेदार विनायक चव्हाण यांच्याकडे तक्रार करीत न्यायाची मागणी केली. चव्हाण यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आश्वासन दिले.


Web Title: Accident case accused school van driver vanished from police station
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.