आॅटिझमचा स्वीकार होणे महत्त्वाचे
By Admin | Updated: April 3, 2016 03:52 IST2016-04-03T03:52:22+5:302016-04-03T03:52:22+5:30
‘आॅटिझम’(स्वमग्न) हा आज काही सर्वसामान्यांसाठी तितका म्हणजे पूर्णपणे अनोळखी, अपरिचित शब्द उरलेला नाही.

आॅटिझमचा स्वीकार होणे महत्त्वाचे
अभिमन्यू निसवाडे : मनोचिकित्सा विभाग व ‘आयएपी’तर्फे ‘आॅटिझम’ दिन साजरा
नागपूर : ‘आॅटिझम’(स्वमग्न) हा आज काही सर्वसामान्यांसाठी तितका म्हणजे पूर्णपणे अनोळखी, अपरिचित शब्द उरलेला नाही. पण तरीही मुलाला आॅटिझम असल्याचे कळेपर्यंत हा शब्दही ऐकला नव्हता, ही प्रतिक्रिया आजही सर्रास ऐकायला मिळते. या आजाराविषयी जागरुकतेची तितकीच गरज आहे. नुसती आजाराची माहिती असणे पुरेसे नाही, तर आता समाजात या आॅटिझमचा स्वीकार होणेही महत्त्वाचे आहे. यासाठी डॉक्टरांसह प्रत्येक व्यक्तीने मूल जन्मल्यानंतर पुढील सहा महिन्यात आजाराचे निदान करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी येथे केले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) मनोचिकित्सा विभाग, इंडियन अॅकेडमी आॅफ पेडियाट्रिक्स (आयएपी) यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी जागतिक आॅटिझम दिवस साजरा करण्यात आला. यावेळी ते मुख्य अतिथी म्हणून बोलत होते. मंचावर मेडिकलच्या बालरोग विभागाचे प्रमुख व आयएपीचे अध्यक्ष डॉ. सी.एम.बोकडे, मनोचिकित्सा विभागाचे प्रमुख डॉ. प्रशांत टिपले, डॉ. मनीष ठाकरे, आयएपीचे सचिव डॉ. डहाके व ‘संवेदना स्कूल फॉर चिल्ड्रेन विथ आॅटिझम’च्या संचालिका ज्योती फडके उपस्थित होत्या.
डॉ. निसवाडे म्हणाले, मूल जन्माला आल्यानंतर सहा महिन्यात या आजाराचे निदान झाल्यास पालक, सायकॉलिजिस्ट व विशेष शाळेच्या मदतीने दिली जाणारी बिहेविअर थेरपी व त्यांचे संवाद, भाषा, सामाजिक वर्तणूक सुधारण्यासाठी दिले जाणारे ट्रेनिंग फायद्याचे ठरते. परंतु आजार कळेपर्यंतच ५ ते ७ वर्षे उलटलेली असतात. अशा मुलांमध्ये ज्या चांगल्या स्किल्स असतात, त्यांना चालना देण्यासाठी फार परिश्रम घ्यावे लागतात, असेही ते म्हणाले. उद्घाटन कार्यक्रमानंतर सहभागी तज्ज्ञांनी विविध विषयांवर आपले विचार मांडले. डॉ. सुधीर महाजन यांनी आॅटिझम आणि निदान यावर मार्गदर्शन केले. डॉ. उर्मिला चव्हाण यांनी आॅटिझममध्ये येणारे इतर आजार व उपचाराची माहिती दिली. डॉ. सोफिया आसाद यांनी आॅटिझमवर आॅक्युपेशनल उपचार पद्धतीची माहिती दिली. ‘संवेदना स्कूल फॉर चिल्ड्रेन विथ आॅटिझम’च्या डॉ. मृणालिनी बल्लाळ व डॉ. लक्ष्मी सांबरे यांनी शाळेची माहिती देऊन, विद्यार्थ्यांचा कसा विकास साधला जातो यावर मार्गदर्शन केले. संचालन डॉ. श्रेयस मागीया व डॉ. प्रांजली भगत यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. मनीष ठाकरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.(प्रतिनिधी)