लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना फेसबुकवर अश्लिल भाषेत कमेंट करत शिवीगाळ करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात आरोपी जीममालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुनी कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला.
किशोर चरणदास मेश्राम (४२, वाठोडा) असे आरोपीचे नाव आहे. तर नवीन कामठी येथील भाजपचे कार्यकर्ते प्रमोद गेडाम (५५) यांनी तक्रार केली आहे. मेश्राम हा गेडाम यांचा फेसबुक फ्रेंड आहे. १६ ऑगस्ट रोजी बावनकुळे यांच्या हस्ते कामठी भाजीबाजाराजवळील धोबीघाटाचे बावनकुळे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. पवन शर्मा नावाच्या व्यक्तीने तेथील बावनकुळे यांच्या भाषणाचा व्हिडीओ फेसबुकवर शेअर केला. गेडाम यांनी दुसऱ्या दिवशी त्यांच्या अकाऊंटवरून तो व्हिडीओ शेअर केला. त्यावर मेश्रामने शिवीगाळ करत कमेंट लिहीली. रेतीघाटातून कमिशन मिळत नाही म्हणून बावनकुळे यांनी रेतीघाट बंद केले तसेच रजिस्ट्री कार्यालयातून काहीच भेटत नसल्याने रिसेलची रजिस्ट्रीदेखील बंद केली असे म्हणत मेश्रामने शिवीगाळ केली. ही कमेंट गेडाम यांनी पाहिली. बावनकुळे यांची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न यातून मेश्रामने केल्याचा आरोप गेडाम यांनी लावला व जुनी कामठी पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी आरोपी मेश्रामविरोधात गुन्हा दाखल केला आहे.