अपहृत विद्यार्थीनी नागपूर रेल्वेस्थानकावर आढळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2019 23:01 IST2019-07-27T22:59:42+5:302019-07-27T23:01:23+5:30
अकराव्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीचे अपहरण करून अहमदाबादला पळवून नेणाऱ्या तरूणाचा लोहमार्ग पोलिसांनी शोध घेतला. नागपूर रेल्वेस्थानकावर रेल्वेगाडीची वाट पाहत असताना लोहमार्ग पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले. कायदेशिर कारवाईनंतर दोघांनाही शुक्रवारी रात्री देवलापार पोलिसांच्या ताब्यात दिले.

अपहृत विद्यार्थीनी नागपूर रेल्वेस्थानकावर आढळली
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अकराव्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीचे अपहरण करून अहमदाबादला पळवून नेणाऱ्या तरूणाचा लोहमार्ग पोलिसांनी शोध घेतला. नागपूर रेल्वेस्थानकावर रेल्वेगाडीची वाट पाहत असताना लोहमार्ग पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले. कायदेशिर कारवाईनंतर दोघांनाही शुक्रवारी रात्री देवलापार पोलिसांच्या ताब्यात दिले.
कविता (बदललेले नाव) असे अपहरण झालेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. ती अल्पवयीन असून ११ व्या वर्गात शिकते. अपहरण करणारा आकाश हा २१ वर्षांचा असून त्याचे लग्न झाले आहे. कविता आणि आकाश यांची ओळख झाली. ओळखीचे रुपांतर मैत्रीत झाले. आकाशने तिला फुस लाऊन पळविले. शुक्रवारी सकाळी ११ वाजता कविता तिच्या मैत्रीणीसोबत घरुन निघाली. ठरल्याप्रमाणे आकाश त्यांना भेटला. आकाश त्यांना घेऊन भंडाऱ्याला गेला. भंडाऱ्यावरून कविताची मैत्रीण घरी परतली. घडलेला प्रकार तिने कविताच्या कुटुंबीयांना सांगितला. त्यामुळे कविताच्या कुटुंबीयांनी आकाशविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दिली. कविता अल्पवयीन असल्यामुळे पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला. देवलापार पोलिसांनी लोहमार्ग पोलीस उपनिरीक्षक रोशन खांडेकर यांना विद्यार्थिनी आणि अपहरण करणाऱ्याआरोपीची माहिती दिली. आकाश आणि कविता दोघेही गणेशपेठ बसस्थानकावर आले. तेथून पायी नागपूर रेल्वेस्थानकावर पोहोचले. अहमदाबादला जाण्यासाठी ते प्लॅटफार्म क्रमांक २/३ वर मुंबई एण्डकडील भागात बसले होते. लोहमार्ग पोलिसांना माहिती मिळताच उपनिरीक्षक रोशन खांडेकर, उपनिरीक्षक घाडगे, शिपाई भास्कर पांडे, महिला पोलीस सातारकर यांनी रेल्वेस्थानकावर शोध घेतला. त्यांना दोघेही प्लॅटफार्मवर आढळले. त्यांची चौकशी करून लोहमार्ग पोलीस ठाण्यात आणले. ते सापडल्याची माहिती देवलापार पोलिसांना देण्यात आली. देवलापार पोलीस आल्यानंतर या दोघांनाही त्यांच्या स्वाधीन करण्यात आले.