पदवीधर मतदार' नोंदणीसाठी 'आधार' ऐच्छिक ! निवडणुकीसाठी आयोगाची अधिसूचना
By आनंद डेकाटे | Updated: September 15, 2025 20:10 IST2025-09-15T20:09:52+5:302025-09-15T20:10:20+5:30
Nagpur : ३० सप्टेंबर ते ३० डिसेंबरपर्यंत नोंदणी प्रक्रिया

'Aadhaar' optional for registration of graduate voters! Commission's notification for elections
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी मतदार नोंदणीवरून कळीचा मुद्दा ठरलेल्या आधार कार्डवरून चांगलाच सावळागोंधळ निर्माण झाला होता. ही बाब लक्षात घेता राज्यातील आगामी पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीपूर्वी मतदार नोंदणीसाठीही आधार कार्ड ऐच्छिक करण्यात आले आहे.
राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी काढलेल्या पदवीधर मतदारसंघाच्या मतदारनोंदणी अधिसूचनेमध्ये नोंदणी अधिकाऱ्यांवर आधार कार्डबाबत कडक सूचना देण्यात आल्या असून, या कार्डअभावी कुणाचीही नोंदणी रद्द करू नये, असे स्पष्टपणे बजावले आहे. एवढेच नव्हे तर आधार कार्डची माहिती सार्वजनिक झाल्यास संबंधित मतदार नोंदणी अधिकाऱ्याविरूध्द कठोर शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. या निवडणुकीसाठी ३० सप्टेंबर २०२५ रोजी मतदार नोंदणीची सूचना प्रसिद्ध होईल. ३० डिसेंबर, २०२५ रोजी अंतीम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. पुढील वर्षी २०२६ मध्ये राज्यातील औरंगाबाद, पुणे, नागपूर पदवीधर आणि अमरावती, पुणे शिक्षक मतदारसंघाची निवडणूक होणार आहे. त्यासाठी १२ सप्टेंबरला राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी नोटीफिकेशन काढले आहे.
अर्जाचा नवा नमुना प्रसिध्द होणार
या निवडणुकीसाठी मतदार नोंदणी अधिनियम १९६० च्या कलम ३१(२) अन्वये जुना नमुना अर्जाच्या ऐवजी सुधारीत नमुना प्रसिद्ध् केला जाणार आहे. त्यासाठीचे छपाईचे आदेशही शासकीय मुद्रणालयास देण्यात आले आहेत.
असा आहे कार्यक्रम
- मतदार नोंदणी कायद्यानुसार जाहीर सूचना प्रसिद्ध करणे : ३० सप्टेंबर
- वर्तमानपत्रात नोटीस : १५ ऑक्टोबर
- वर्तमानपत्रात द्वितीय नोटीस : २५ ऑक्टोबर
- नमुना १८, १९ द्वारे दावे, हरकती स्वीकारण्याचा शेवटचा दिवस : ६ नोव्हेंबर
- प्रारुप मतदार याद्यांची छपाई : २० नोव्हेंबर
- प्रारुप मतदार याद्यांची प्रसिद्धी : २५ नोव्हेंबर
- दावे, हरकती स्वीकरण्याचा कालावधी : २५ नोव्हेंबर ते १० डिसेंबर
- पुरवणी यादी तयार करणे, छपाई करणे : २५ डिसेंबर
- मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी ३० डिसेंबर