कचऱ्यात आढळले आधार कार्ड

By Admin | Updated: May 7, 2017 02:11 IST2017-05-07T02:11:44+5:302017-05-07T02:11:44+5:30

‘सर्वसामान्यांचा एकच आधार’ असलेल्या आधार कार्डसाठी सर्वत्र विशेष मोहीम राबविण्यात आली.

Aadhaar cards found in the trash | कचऱ्यात आढळले आधार कार्ड

कचऱ्यात आढळले आधार कार्ड

डिगडोहच्या बन्सीनगरातील प्रकार : तहसील प्रशासनाने केला घटनास्थळाचा पंचनामा
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणा : ‘सर्वसामान्यांचा एकच आधार’ असलेल्या आधार कार्डसाठी सर्वत्र विशेष मोहीम राबविण्यात आली. प्रत्येक नागरिकाची ओळख ठरविणाऱ्या या कार्डची वितरण प्रणाली मात्र किती ढिसाळ आहे, याचा प्रत्यय शनिवारी डिगडोह भागातील बन्सीनगरात बघावयास मिळाला. या परिसरात असलेल्या जीर्ण रेल्वे क्वॉर्टरजवळ चक्क ९८ आधार कार्ड कचऱ्यात फेकल्याचे आढळून आले.
शनिवारी दुपारच्या सुमारास कचऱ्यात आधार कार्ड असल्याचे समजताच नागरिकांनी पाहण्यासाठी घटनास्थळी गर्दी केली. परिसरातील काही सुजाण नागरिकांनी याबाबत तत्काळ तहसील प्रशासनास सूचना दिली. लागलीच तहसील कार्यालयातील अधिकारी घटनास्थळी पोहोचले. अधिकाऱ्यांनी पंचनामा करून सर्व कार्ड ताब्यात घेतले.
सर्व आधार कार्ड हे डिगडोह परिसरातील नागरिकांचे असून ते बंद लिफाफ्यात होते. विशेष म्हणजे, सदर लिफाफ्यावर पोस्टाचा शिक्कादेखील लागला आहे. परंतु जीर्ण इमारतीत हे कार्ड कुठून आणि कसे आले, याबाबत कळू शकले नाही.
आधार कार्ड वितरित करण्याऐवजी या इमारतीत कसे आले, याबाबत कुणालाही माहिती नाही. पण सर्वसामान्य नागरिकांचे आधार कार्ड इतक्या निष्काळजीने कसे हाताळले जाते, हा प्रश्नच आहे.

सर्व आधार कार्ड तहसील कार्यालयात जमा
या संदर्भात सूचना मिळताच अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाठवून सर्व आधार कार्ड तहसील कार्यालयात जमा करण्यात आले. सोबतच त्या ठिकाणी पंचनामा करण्यात आला. पोस्ट विभागाचा शिक्का त्या लिफाफ्यांवर आहे. त्यामुळे त्याचे वितरण का करण्यात आले नाही. संबंधित कार्डधारक व्यक्ती जर मिळाली नाही तर ते स्थानिक ग्रामपंचायत अथवा तहसील कार्यालयात जमा का करण्यात आले नाही, याबाबत चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार प्रताप वाघमारे यांनी दिली.

 

Web Title: Aadhaar cards found in the trash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.