हिरोगिरीचे स्वप्न घेऊन आलेला ओडिशाचा तरुण बनला खलनायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2022 09:29 PM2022-08-22T21:29:53+5:302022-08-22T21:50:49+5:30

Nagpur News मित्रासोबत दगाफटका करून त्याची रक्कम लंपास करणाऱ्या दगाबाज मित्राला पोलिसांनी शिताफीने जेरबंद केले.

A youth from Odisha who came with a dream of heroism turned into a villain | हिरोगिरीचे स्वप्न घेऊन आलेला ओडिशाचा तरुण बनला खलनायक

हिरोगिरीचे स्वप्न घेऊन आलेला ओडिशाचा तरुण बनला खलनायक

Next
ठळक मुद्देमित्राची रक्कम लुटून स्वत:सह भरले कुटुंबीयांचे अकाउंटरिक्षाचालकाचा रूम पार्टनरसोबत दगाफटका

नरेश डोंगरे ।

नागपूर- एका रूममध्ये राहून अनेकदा एकमेकांच्या ताटात जेवणाऱ्या एका मित्राची मती फिरली. त्याने आपल्या जिवलग मित्राची रोकड चोरली. त्यातील सात लाख रुपये त्याने स्वत:सह पत्नी आणि आईच्या बँक खात्यात जमा केले अन् उर्वरित रोकड घेऊन गावाकडे निघाला. मात्र, गावाला पोहोचण्यापूर्वीच पोलिसांनी त्याच्यावर झडप घालून त्याला जेरबंद केले. एखाद्या सिरियलमधील वाटावा असा हा क्राइम सीन मुंबईतून सुरू झाला अन् तीन दिवसांनंतर नागपुरात त्याचा क्लायमॅक्स झाला.

झटपट श्रीमंतीसह अनेक स्वप्नांची शिदोरी घेऊन ओडिशाच्या बालेश्वर जिल्ह्यातील दीपक बिनोद नायक हा तरुण पाच वर्षांपूर्वी मायानगरी मुंबईत आला. त्याला हिरोगिरी करायची होती. मात्र, ते काही जमले नाही. जवळचे होते नव्हते सारे संपल्याने भुकेचे चटके त्याला वास्तवाचे धडे शिकवून गेले. हिरोच काय, स्पॉटबॉयही बनणे शक्य नसल्याचे त्याच्या ध्यानात आले. मात्र, मुंबईचा मोह काही त्याला सुटत नव्हता. त्यामुळे दीपकने रिक्षा चालविणे सुरू केले. दरम्यान, नेहमी ग्राहक घेऊन जात असल्याने एका पब मॅनेजरसोबत त्याची ओळख झाली. ती मैत्रीत रूपांतरीत झाली अन् पब मॅनेजर कुणाल (बदललेले नाव) सोबत तो त्याच्या रूममध्ये राहू लागला. एकत्र राहणे, एकत्र खाणे, सोबतच वेगवेगळा एन्जॉय करणे सुरू झाले. मैत्री बहरल्याने कुणालचा दीपकवर चांगला विश्वास बसला. तो प्रत्येक गोष्ट, व्यवहार त्याच्याशी शेअर करू लागला.

अलीकडे एका रूमच्या विक्रीचा कुणालने साैदा केला. त्यासाठी त्याने १३ लाखांची रोकड घरी आणून ठेवली. ही रोकड पाहून दीपकची मती फिरली. त्याने कुणालशी दगाफटका करून १९ ऑगस्टला ही रोकड चोरली. गावात जायचे आणि ऐशोआरामात जगायचे, असे स्वप्न त्याने रंगविले. मात्र, एवढी मोठी रोकड घेऊन मुंबईहून ओडिशाला जाणे धोक्याचे आहे, मध्येच कुणी हात मारला तर हात चोळत बसावे लागेल, याची कल्पना असल्याने त्याने स्वत:च्या आणि आईच्या प्रत्येकी दोन लाख, तर पत्नीच्या खात्यात तीन लाख असे एकूण सात लाख रुपये वेगवेगळ्या बँक खात्यात जमा केले. त्यानंतर ९१ हजारांचे मंगळसूत्र घेतले अन् बाकी किरकोळ खर्च करून ४ लाख ११ हजारांची रोकड घेऊन तो ओडिशाला जाण्यासाठी गीतांजली एक्सप्रेसमध्ये बसला.

मोबाईलने केली चुगली

रोकड चोरीला गेल्याचे तसेच रूम पार्टनर दीपकही गायब असल्याने कुणालने मुंबईच्या सांताक्रूझ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. ठाणेदार दत्तात्रय खाडे यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने दीपकचे मोबाईल लोकेशन अन् रेल्वे स्थानकावरचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. तो गीतांजली एक्सप्रेसने पळून जात असल्याचे लक्षात आले. त्यामुळे मुंबई पोलिसांनी आरपीएफला अलर्ट देऊन त्यांच्या मदतीने रविवारी दीपकला वर्धा ते नागपूरदरम्यान धावत्या रेल्वेत ताब्यात घेतले.

पोलिसांनी उधळले स्वप्नांचे मनोरे

हिरोगिरीचे स्वप्न घेऊन ओडिशातून मुंबईत आलेला आणि ते स्वप्न पूर्ण न झाल्याने मित्राशी दगाफटका करून खलनायक बनलेल्या दीपकला पोलिसांनी नागपुरातून मुंबईत नेले आहे. गावात जाऊन चोरीच्या पैशाच्या बळावर ऐशोआराम करण्याचे त्याच्या स्वप्नाचे मनोरे तूर्त पोलिसांकडून उधळले गेले आहे. त्याचा क्राईम रेकॉर्ड तपासण्यात येत असल्याचे सांताक्रूझचे ठाणेदार खाडे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

----

Web Title: A youth from Odisha who came with a dream of heroism turned into a villain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.