निर्माणाधीन चौथ्या मजल्यावरून उडी घेत युवतीची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2023 20:16 IST2023-04-29T20:15:35+5:302023-04-29T20:16:36+5:30
Nagpur News चौथ्या मजल्यावरून उडी घेऊन एका १९ वर्षाच्या तरुणीने आत्महत्या केल्याची घटना कपिलनगर ठाण्यांतर्गत कडू ले-आऊट परिसरात शुक्रवारी सकाळी ७.३० ते ११.३० वाजता दरम्यान घडली आहे.

निर्माणाधीन चौथ्या मजल्यावरून उडी घेत युवतीची आत्महत्या
नागपूर : चौथ्या माळ्यावरून उडी घेऊन एका १९ वर्षाच्या तरुणीने आत्महत्या केल्याची घटना कपिलनगर ठाण्यांतर्गत कडू ले-आऊट परिसरात शुक्रवारी सकाळी ७.३० ते ११.३० वाजता दरम्यान घडली आहे.
स्नेहा पंकज शर्मा (वय १९, रा. म्हाडा कॉलनी, कडू ले-आऊट) असे आत्महत्या केलेल्या युवतीचे नाव आहे. बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर ती एमएस्सी आयटीचा कोर्स करीत होती. तिचे वडील पंकज शर्मा बांधकाम ठेकेदार आहेत. आपल्या घरापासून काही अंतरावर असलेल्या पंचम अपार्टमेंटच्या चौथ्या माळ्यावरून उडी घेऊन तिने आत्महत्या का केली, याची माहिती मिळू शकली नाही. चौथ्या माळ्यावरून उडी घेतल्यामुळे तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर तिला उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. स्नेहाचे वडील पंकज शर्मा यांच्या सूचनेवरून कपिलनगर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.
स्नेहाला होती इमारतीची माहिती
स्नेहा नेहमी शाळेत जाताना उडी घेतलेल्या इमारतीपासून ये-जा करीत होती. या इमारतीच्या तिसऱ्या माळ्यापर्यंत नागरिक राहतात. परंतु चौथ्या माळ्याचे बांधकाम अर्धवट झालेले आहे. स्नेहाला या इमारतीची संपूर्ण माहिती असल्याचा अंदाज आहे. कोणत्या कारणामुळे तिने या इमारतीवरून उडी घेऊन आत्महत्या केली, याची माहिती पोलिसांच्या तपासात पुढे येऊ शकते.