लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सावनेर शहरातील नागपूर मार्गावर असलेल्या गुजरखेडी येथील नागमंदिराजवळ तरुणाची चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना शुक्रवारी (दि. १९) रात्री १ ते ९:१५ वाजताच्या सुमारास घडली. तरुण जखमी अवस्थेत खाली कोसळताच आरोपी पळून गेले. त्याच्या हत्येचे कारण कळू शकले नसले. परंतु, दुसऱ्यांच्या प्रेमप्रकरणातून उद्भवलेल्या वादातून त्याची हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
करणसिंग रमेशसिंग परसराम (३०, रा. वेकोलि कॉलनी, सावनेर) असे मृताचे नाव आहे. करणसिंग हा माळेगाव (टाऊन), ता. सावनेर शिवारातील कंपनीत कामगार म्हणून काम करायचा. त्याचे वडील रमेशसिंग वेकोलित नोकरीला आल्याने तो कुटुंबीयांसह वेकोलि कॉलनीत राहायचा. तो शुक्रवारी रात्री इतर पाच ते सहा जणांसोबत रात्री नागमंदिराजवळ गप्पा करीत उभा होता.
काही कळण्याच्या आत दोघांपैकी एकाने त्याच्या गळा आणि दुसऱ्याने त्याच्या पोटावर चाकूने वार केले. तो जखमी अवस्थेत कोसळताच सर्व जण लगेच तिथून पळून गेले. आरोपी करणसिंगच्या ओळखीचे असावे. त्यालाही दुसन्याच्या प्रेमप्रकरणाची माहिती असावी. त्यामुळेच तो त्यांच्या वादात पडला असावा, अशी शक्यताही पोलिस सूत्रांनी व्यक्त केली आहे. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून त्याला सावनेर शहरातील शासकीय रुग्णालयात नेले. तिथे डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी सावनेर पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
पाच आरोपींना घेतले ताब्यात
करणसिंग ज्या कंपनीत काम करायचा, त्याच कंपनीत काम करणाऱ्या एका तरुणीसोबत कंपनीतील काही तरुण कामगारांचे प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधाशी करणसिंगचा काहीही संबंध नाही. यांचे प्रेमसंबंध होते त्यांच्यात वाद झाला आणि करणसिंग मध्ये गेला. त्यातच त्याच्यावर चाकूने वार करण्यात आले. या प्रकरणात सावनेर पोलिसांनी चार व स्थानिक गुन्हे शाखेने एक अशा पाच आरोपींना ताब्यात घेतले आहे. त्यांची नावे कळू शकली नाही. सर्व आरोपी माळेगाव (टाऊन) व परिसरातील आहेत.