तीव्र चटक्यांनी दिले नवतपाचे संकेत; पारा ४३ अंशावर, पाच दिवस प्रखर सूर्यप्रकाश
By निशांत वानखेडे | Updated: May 24, 2023 20:02 IST2023-05-24T20:01:54+5:302023-05-24T20:02:24+5:30
बुधवारी पुन्हा एकदा सूर्याच्या किरणांनी नागपूरकरांना चटके दिले.

तीव्र चटक्यांनी दिले नवतपाचे संकेत; पारा ४३ अंशावर, पाच दिवस प्रखर सूर्यप्रकाश
नागपूर : बुधवारी पुन्हा एकदा सूर्याच्या किरणांनी नागपूरकरांना चटके दिले. आकाश काहीसे ढगांनी व्यापले असले तरी उष्णतेचा प्रकाेप अधिक जाणवत हाेता. शहरात दिवसा ४३ अंश कमाल तापमानाची नाेंद झाली. गुरुवारपासून नवतपाला सुरुवात हाेणार असून त्याची प्रखरता तीव्र राहण्याचे संकेत आदल्याच दिवशी मिळाले आहेत.
गेल्या काही दिवसात तापमानात चढउतार चाललेला आहे. मात्र मे महिन्याचे दाेन दिवस वगळता ताे अत्याधिक तिव्रतेकडे गेला नाही. असे असले तरी उन्हाचे चटके व उष्णतेने नागरिकांना हैराण केले आहे. हवामान विभागाने विजांच्या कडकडाटासह ढगाळ वातावरणाचा अंदाज व्यक्त केला हाेता पण बुधवारी तशी स्थिती निर्माण झाली नाही. बुधवारी वर्धा येथे सर्वाधिक ४३.४ अंश कमाल तापमानाची नाेंद झाली. ४३ अंशासह नागपूर व अकाेला त्या खाली हाेते. इतर जिल्ह्यात अमरावती ४२.६ अंश, चंद्रपूर ४२.८ अंश, वाशिम ४२ अंश, गाेंदिया ४२.२ अंश तापमान नाेंदविण्यात आले.
दरम्यान गुरुवार २५ मे पासून २८ मे पर्यंत आकाश निरभ्र राहणार असून सूर्याची प्रखरता अधिक तीव्रपणे जाणविण्याचा अंदाज विभागाने वर्तविला आहे. मात्र पारा ४२ ते ४३ अंशावर राहणार असल्याचा अंदाजही आहे.