कारागृहातून सुटल्यावर बनवली रील; कुख्यात गुंड सुमित ठाकूरविरोधात गुन्हा दाखल
By योगेश पांडे | Updated: March 5, 2025 00:25 IST2025-03-05T00:19:11+5:302025-03-05T00:25:56+5:30
सुमित आणि त्याच्या सहकाऱ्यांवर मकोका कारवाई करण्यात आली होती.

कारागृहातून सुटल्यावर बनवली रील; कुख्यात गुंड सुमित ठाकूरविरोधात गुन्हा दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: तुरुंगातून सुटल्यानंतर वाहनांच्या ताफ्यात फिरून गोंधळ घालत रील बनविणाऱ्या कुख्यात सुमित ठाकूरविरुद्ध गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला आहे.
सुमित ठाकूर, उजेर उर्फ उज्जी आणि इतर चार साथीदारांनी ऑक्टोबर २०२३ मध्ये जरीपटका येथून दोन तरुणांचे अपहरण करून त्यांना गंभीर जखमी केले होते. नंतर, पीडितांना धमकावले गेले आणि खटला मागे घेण्यासाठी दबाव आणला गेला. या प्रकरणात सुमित आणि त्याच्या सहकाऱ्यांवर मकोका कारवाई करण्यात आली होती. नंतर सुमितला अटक करण्यात आली. त्याला मकोका प्रकरणात सशर्त जामीन मिळाला आहे. सुमित २ मार्च रोजी तुरुंगातून सुटला. त्याला घेण्यासाठी अनेक गुन्हेगार तुरुंगात पोहोचले होते. तिथून तो त्याच्या साथीदारांसह गाड्यांच्या ताफ्यात निघाला. त्याच्या साथीदारांनी याचा व्हिडिओ बनवला आणि तो सोशल मीडियावर व्हायरल केला. रीलच्या पार्श्वसंगीतात 'बाप तो बाप रहेगा' हे हरियाणवी गाणे वाजत आहे. ही रील समोर येताच गुन्हे शाखेने कारवाई सुरू केली.
सुमितला ताब्यात घेऊन गुन्हे शाखेत आणण्यात आले. त्याच्याविरुद्ध सायबर पोलिस ठाण्यात बीएनएसच्या कलम १९२, ३५३ (१), ३५१ (२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. भविष्यात असे कृत्य पुन्हा करू नये अशी ताकीद त्याला देण्यात आली. काही दिवसांअगोदरच कुख्यात राजा गौस व पुण्यातील गजा मारणेचीदेखील रील व्हायरल झाली होती. पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता.