विमानात प्रवाशाला मिरगीचा झटका; दिल्ली-हैदराबादचे विमान नागपुरात उतरले
By मोरेश्वर मानापुरे | Updated: February 1, 2024 22:48 IST2024-02-01T22:47:53+5:302024-02-01T22:48:10+5:30
दिल्लीहून हैदराबादकडे जाणाऱ्या विस्तारा एअरलाइन्सच्या व्हीके ८२९ विमानात एका प्रवाशाला मिरगीचा झटका आला.

विमानात प्रवाशाला मिरगीचा झटका; दिल्ली-हैदराबादचे विमान नागपुरात उतरले
नागपूर : दिल्लीहून हैदराबादकडे जाणाऱ्या विस्तारा एअरलाइन्सच्या व्हीके ८२९ विमानात एका प्रवाशाला मिरगीचा झटका आला. प्रवाशाची बिघडलेली प्रकृती पाहता विमान गुरुवारी नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरविण्यात आले. प्रवाशावर किम्स-किंग्ज्वे रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
विनय कुमार गोयल (४४) असे या प्रवाशाचे नाव आहे. गोयल हे विस्तारा एअरलाइन्सने हैदराबाद येथे जात होते. त्यांना मिरगीचा झटका आला. सीटवरून खाली पडल्याने त्यांचा खांदा निखळला आणि जीभ दाताखाली चावल्या गेली. अचानक झालेल्या या प्रकारामुळे विमानाचे आपात्कालीन लॅण्डिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला. विमानतळावर तैनात असलेल्या किम्स-किंग्ज्वे रुग्णालयाच्या वैद्यकीय चमूने प्राथमिक तपासणी करून तात्काळ रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेतला.
सध्या गोयल यांच्यावर मेंदूरोगतज्ज्ञ डॉ. प्रतीक उत्तरवार यांच्या मार्गदर्शनात उपचार सुरू आहे. डॉ. उत्तरवार म्हणाले, गोयल यांना मेंदूशी संबंधित आजार असून, चंडीगड येथे गोयल उपचार घेत आहेत. दरम्यान, हवाई प्रवासादरम्यान त्यांना अचानक फिट्स आल्यात आणि त्यांची प्रकृती खालावली. इस्पितळात दाखल करण्यात आले तेव्हा ते बेशुद्धावस्थेत होते. येथे त्यांचे स्कॅनिंग करण्यात आले असून, मेंदूच्या नसेत क्लॉट असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यानुसार, त्यांच्यावर पुढील उपचार सुरू आहेत. सध्या प्रकृती स्थिर आहे. हे विमान काही वेळाने उर्वरित प्रवाशांना घेऊन हैदराबादकडे रवाना झाले.