दारुच्या वादातून तिघांनी केली कुख्यात गुन्हेगाराची दगडाने ठेचून हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2023 22:24 IST2023-06-12T22:24:33+5:302023-06-12T22:24:55+5:30
Nagpur News दारूच्या वादातून एका कुख्यात गुन्हेगाराची तीन आरोपींनी दगडाने ठेचून हत्या केली. कळमना वस्तीतील या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती.

दारुच्या वादातून तिघांनी केली कुख्यात गुन्हेगाराची दगडाने ठेचून हत्या
नागपूर : दारूच्या वादातून एका कुख्यात गुन्हेगाराची तीन आरोपींनी दगडाने ठेचून हत्या केली. कळमना वस्तीतील या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती. या घटनेतील तिन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. आतिश ऊर्फ बाबा वरफाटा राजाराम ठाकरे (२६,लाभलक्ष्मी ले आऊट, कळमना वस्ती) असे मृताचे नाव आहे.
सोमवारी सकाळी त्याचा वस्तीतील मंदिराजवळील मोकळ्या जागेत मृतदेह आढळला. त्याची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांचे पथक पोहोचल्यावर संबंधित मृतदेह आतिशचा असल्याची बाब स्पष्ट झाली. पोलिसांनी लगेच तपास यंत्रणा कामाला लावली व तीन तासांत आसीफ इम्तियाज अली (२१, कळमना वस्ती), सोहेल ऊर्फ अन्नू प्यारे शेख (२२, पावनगाव रोड, कळमना) व राहुल बंडू बागडे (१९, लाभलक्ष्मीनगर) या आरोपींना अटक केली.
आतिश ठाकरे हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा होता व त्याच्यावर मारहाण, चोरीसह सहा गुन्हे दाखल होते. त्याला तडिपारदेखील करण्यात आले होते. काही दिवसांअगोदर त्याचा आसिफसोबत दारू पिण्यावरून वाद झाला होता. रविवारी रात्री नऊ वाजता तीनही आरोपी आतिशच्या घरी आले व त्यांनी त्याला दारू पिण्यासाठी सोबत नेले. आतिशदेखील लगेच त्यांच्यासोबत गेला. दत्तनगरातील शिव मंदिराजवळ चौघेही दारू पित बसले होते. दारू संपल्यानंतर आतिशला दारूसाठी पैसे मागितले असता त्याने शिवीगाळ केली. त्यातून वाद वाढला व तीनही आरोपींनी आतिशला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याचा दगडाने ठेचून खून केला. त्याचा मृत्यू झाल्यावर तिघेही घटनास्थळावरून फरार झाले. सकाळी वस्तीतील लोकांना त्याचा मृतदेह दिसला. पोलिसांनी चौकशी केली असता आतिश तिघांसोबत गेल्याची बाब समोर आली. त्यानंतर काही वेळातच तीनही आरोपींना अटक करण्यात आली. त्यांच्याविरोधात कळमना पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.