लाखो रुपये खर्चून विद्यार्थ्यांसाठी उभारण्यात आलेली लायब्ररी धुळखात
By गणेश हुड | Updated: January 19, 2024 14:04 IST2024-01-19T14:04:30+5:302024-01-19T14:04:43+5:30
चार महिन्यापूर्वी नागपूर सुधार प्रन्यासने या लायब्ररीची दुरुस्ती केली. परंतु पुन्हा ही लायब्ररी वापराविना धुळ खात पडून आहे.

लाखो रुपये खर्चून विद्यार्थ्यांसाठी उभारण्यात आलेली लायब्ररी धुळखात
नागपूर : बिनाकी लेआउट परिसरातील पंचवटी नगरमधे १५ वर्षापूर्वी दलीत वस्ती सुधार योजनेच्या निधीतून दोन माळ्याची लायब्ररी उभारण्यात आली होती. चार महिन्यापूर्वी नागपूर सुधार प्रन्यासने या लायब्ररीची दुरुस्ती केली. परंतु पुन्हा ही लायब्ररी वापराविना धुळ खात पडून आहे.
लायब्ररी वापरविना पडून असल्याने दुरुस्तीला आली होती. लायब्ररीची दुरुस्ती करून सुरू करण्यात यावी अशी विद्यार्थ्यांची व स्थानिक नागरिकांची मागणी होती. त्यानुसार नासुप्रने दुरुस्तीवर १५ लाख रुपये खर्च केले. लायब्ररी सुरू करण्यासाठी नासुप्रशी पत्रव्यवहर केला. परंतु हस्तांतर न झाल्यानंतर लायब्ररी सुरू होणार नसल्याची माहिती नासुप्रकडून नागरिकांना देण्यात आली.
शासकीय संस्थेला हस्तांतर झाल्याशिवाय ही लायब्ररी सुरू होणार नाही. लायब्ररीचे पालकत्व देण्याबाबतची भूमिका नासुप्रने घेतली आहे. परंतु कुठल्याही संस्थेला पालकत्व देण्याला आमचा विरोध असून समाज कल्याण विभागाकडे ही लायब्ररी हस्तांतरीत करण्याची मागणी धम्मदीप नगर येथील देवानंद उके यांनी केली आहे.
खासगी संस्थेला ही लायब्ररी चालविण्यासाठी दिली तर ही संस्था देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली विद्यार्थ्यांकडून शुल्क वसुल करेल. गोरगरीब विद्यार्थ्यांना शुल्क देणे शक्य होणार नाही. त्यामुळे ही लायब्ररी चालविण्याची जबाबदारी समाजकल्याण विभागाकडे सोपविण्यात यावी, अशी मागणी स्थानिक नागरिक व विद्यार्थ्यांनी केली आहे.