लंडनवरून येणाऱ्या गिफ्टने गृहिणीला ‘ऑनलाईन’ गंडवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2023 20:52 IST2023-05-10T20:51:55+5:302023-05-10T20:52:38+5:30
Nagpur News लंडनवरून गिफ्ट पाठविण्याच्या नावाखाली गृहिणीला ‘ऑनलाईन’ गंडा घालण्यात आला.

लंडनवरून येणाऱ्या गिफ्टने गृहिणीला ‘ऑनलाईन’ गंडवले
नागपूर : लंडनवरून गिफ्ट पाठविण्याच्या नावाखाली गृहिणीला ‘ऑनलाईन’ गंडा घालण्यात आला. संबंधित आरोपींनी महिलेला ‘इन्स्टाग्राम’वरून संपर्क केला व ओळखीच्या नावाखाली विश्वासघात केला. अंबाझरी पोलिस ठाण्यात यासंदर्भात गुन्हा दाखल झाला आहे.
पुजा (४४) असे फसवणूक झालेल्या गृहिणीचे नाव आहे. त्या गृहिणीचे इन्स्टाग्रामवर खाते होते व एप्रिल महिन्यात तिला डॉ.ऑलिव्हर विलियम्स या नावाने खाते असलेल्या व्यक्तीची ‘फ्रेंड रिक्वेस्ट’ आली. त्याने गृहिणीशी संवाद सुरू केला व लंडनमध्ये स्त्रीरोगतज्ज्ञ असल्याचा दावा केला. काही दिवसांनी त्यांचे व्हॉट्सअपवर चॅटिंग सुरू झाले व चांगलीच ओळख झाली. आपली मैत्री झाली असून मी लंडनमधून काही गिफ्ट पाठवत असल्याची त्याने बतावणी केली. त्यात आयफोन, सोन्याचे ब्रेसलेट इत्यादीचा समावेश असल्याचेदेखील त्याने सांगितले.
गृहिणीने त्याला गिफ्ट नको, असे सांगितले असतानादेखील त्याने मी पाठविले असून लवकरच माझ्या माणसाचा फोन येईल, असे सांगितले. ५ मे रोजी महिलेला जॉन लँबर्ट नावाच्या व्यक्तीचा फोन आला व मुंबई विमानतळावर तुमचे गिफ्ट पोहोचले असून कस्टम क्लिअरन्ससाठी २५ हजार रुपये भरावे लागतील, असे त्याने सांगितले. त्याच्यावर विश्वास ठेवून महिलेने त्याने सांगितलेल्या बँक खात्यावर पैसे पाठविले. काही वेळाने त्याने परत फोन केला व कस्टम्सला आणखी ९० हजार भरावे लागतील. जर पैसे भरले नाही तर कायदेशीर कारवाई होईल, अशी भीती दाखविली. महिलेने ते पैसेदेखील ट्रान्सफर केले.
दुसऱ्या दिवशी त्याने परत फोन करून आणखी दीड लाख रुपये मागितले. आपली फसवणूक होत असल्याचे महिलेच्या लक्षात आले व तिने अंबाझरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी दोन्ही आरोपींविरोधात माहिती तंत्रज्ञान अधिनियमांअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.