ई रिक्षा व बॅटरी चोरणाऱ्या टोळीला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2023 20:23 IST2023-04-19T20:23:28+5:302023-04-19T20:23:53+5:30
Nagpur News आपला चरितार्थ चालावा यासाठी ई रिक्षा चालविणाऱ्यांनाच टार्गेट करून चोरी करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी भंडाफोड केला आहे. या टोळीतील दोघांना पोलिसांनी अटक केली असून चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ई रिक्षा व बॅटरी चोरणाऱ्या टोळीला अटक
नागपूर : आपला चरितार्थ चालावा यासाठी ई रिक्षा चालविणाऱ्यांनाच टार्गेट करून चोरी करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी भंडाफोड केला आहे. या टोळीतील दोघांना पोलिसांनी अटक केली असून चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
सैयद आफताब अली सैय्यद नासीर अली (२०, कुंदनलाल गुप्ता नगर) व शेख अन्वर शेख असलम (२०, कुंदनलाल गुप्ता नगर) अशी अटकेत असलेल्या आरोपींची नावे आहेत. ३० मार्च रोजी या दोघांनीही जागेश्वर शेवडे (३८, जामदार वाडी) यांचा चार्जिंगला असलेल्या ई-रिक्षातील दोन बॅटऱ्या चोरल्या. यासंदर्भात यशोधरानगर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. पोलिसांना खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीवरून दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले व त्यांची सखोल चौकशी करण्यात आली. आरोपींनी शशांक रामनारायण शाहू (१९, शाहू मोहल्ला) व कल्लू मैय्यादीन शाहू (३०, ओमसाईनगर) यांच्यासोबत चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपींकडून दोन ई रिक्षा व रिक्षाच्या १२ बॅटरी असा १ लाख ८४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपींनी एकूण चार गुन्ह्यांची कबुली दिली. सहायक पोलीस निरीक्षक सुरेश कन्नाके, अजय कुटे, आफताब शेख, मनिष झरकर, रोहीत रामटेके व दुर्गेश शुक्ला यांच्या पथकाने ही कारवाई केली.