कारने उडवले, पाच वर्षीय मुलीचा डोळ्यादेखत मृत्यू
By योगेश पांडे | Updated: March 26, 2024 15:50 IST2024-03-26T15:49:30+5:302024-03-26T15:50:33+5:30
धुळवडीच्या दिवशी कुटुंबावर कोसळले आभाळ

कारने उडवले, पाच वर्षीय मुलीचा डोळ्यादेखत मृत्यू
नागपूर : ऐन धुळवडीच्या दिवशी एका कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. एका भरधाव कारच्या धडकेत आईवडीलांसह दुचाकीवरून जाणाऱ्या पाच वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला. जुनी कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
सलोनी दहाट (प्रबुद्ध नगर, जुनी कामठी) असे मृतक मुलीचे नाव आहे. सोमवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास ती वडील राजेश भीमराव दहाट (३९) व आईसोबत दुचाकीवरून देवलापार ते पौनीकर रोड या मार्गाने जात होती. कमसरी बाजार मार्गावर चेक पोस्टजवळ एका काळ्या रंगाच्या कारने दुचाकीला मागून धडक दिली. कार वेगात असल्याने तिघेही खाली पडले.
कारचालक घटनास्थळावरून फरार झाला. सलोनीच्या डोक्याला मार लागला व ती गंभीर जखमी झाली. तिला उपचारासाठी मेयो इस्पितळात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. राजेश यांच्या तक्रारीवरून अज्ञात कारचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.