गर्भवती पत्नीला भेटून परत येताना कार उलटून व्यावसायिकाचा मृत्यू

By योगेश पांडे | Updated: January 25, 2024 23:52 IST2024-01-25T23:51:31+5:302024-01-25T23:52:00+5:30

या घटनेमुळे त्याच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

A businessman died when his car overturned while returning from meeting his pregnant wife | गर्भवती पत्नीला भेटून परत येताना कार उलटून व्यावसायिकाचा मृत्यू

गर्भवती पत्नीला भेटून परत येताना कार उलटून व्यावसायिकाचा मृत्यू

नागपूर : गर्भवती पत्नीला भेटून घरी परतणाऱ्या व्यावसायिकाचा कार उलटून मृत्यू झाला. कपिलनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून संबंधित व्यावसायिकाच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.

वैभव हर्षवर्धन मानेकर (२८, मॉडर्न टाउन, पांजरा, भिलगाव) असे मृताचे नाव आहे. वैभव व्यावसायिक होता व त्याची पत्नी चार महिन्यांची गर्भवती असल्याने माहेरी गेली होती. पत्नी बेझनबाग येथे राहत असल्याने तो बुधवारी रात्री आठ वाजता तिला भेटण्यासाठी गेला. जाताना तो वडील डॉ. हर्षवर्धन यांची एमएच ०१ बीवाय ५७६४ ही कार घेऊन गेला. रात्री दोनच्या सुमारास तो पत्नीला भेटून निघाला. कामठी मार्गाने घराकडे परतत असताना उप्पलवाडी रेल्वेपुलाजवळ त्याचे कारवरील संतुलन बिघडले व कारने रस्ता दुभाजकाला धडक दिली.

वेग जास्त असल्याने कार उलटली व ड्रायव्हर सीटजवळ वैभव दबला. घटनास्थळावरील लोकांनी पोलिसांना फोन केला. पोलिसांनी उपचारासाठी वैभवला मेयो इस्पितळात नेले. मात्र डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. या घटनेची माहिती त्याच्या कुटुंबीयांना देण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कार भरधाव वेगात होती व त्यामुळेच ती उलटली. त्याचे वडील हर्षवर्धन यांनी दिलेल्या तक्रारीवरून कपिलनगर पोलिस ठाण्यात मृताविरोधातच गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या घटनेमुळे त्याच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Web Title: A businessman died when his car overturned while returning from meeting his pregnant wife

टॅग्स :Accidentअपघात