मध्यरात्री क्लबमध्ये नाचताना धक्का लागल्याच्या वादातून हाणामारी
By योगेश पांडे | Updated: May 22, 2023 17:14 IST2023-05-22T17:14:13+5:302023-05-22T17:14:56+5:30
Nagpur News विविध कारणांसाठी चर्चेत असलेल्या ‘डाबो किचन ॲंड क्लब’मध्ये परत एक राडा झाला व नाचताना धक्का लागल्याच्या वादातून हाणामारी करण्यात आली.

मध्यरात्री क्लबमध्ये नाचताना धक्का लागल्याच्या वादातून हाणामारी
योगेश पांडे
नागपूर : विविध कारणांसाठी चर्चेत असलेल्या ‘डाबो किचन ॲंड क्लब’मध्ये परत एक राडा झाला व नाचताना धक्का लागल्याच्या वादातून हाणामारी करण्यात आली. बाऊन्सर्सने भांडणाऱ्या ग्राहकांना बाहेर काढल्यानंतर रस्त्यावर मारामारी सुरू होती. पोलिसांच्या गस्ती पथकाने जाऊन हा प्रकार बंद केला. मध्यरात्री सव्वा ते दीड या कालावधीत हा प्रकार सुरू असल्याने विविध प्रश्न उपस्थित होत आहेत.
राघवेंद्र अतुल मौर्य (३१) हा तरुण सहकाऱ्यांसह डाबोमध्ये गेला होता. नाचत असताना त्याचा धक्का रमण सवाईथूल (३५) याला लागला. यावरून दोघांमध्ये वाद झाला. शाब्दिक वाद वाढल्यानंतर दोघांनीही एकमेकांना शिवीगाळ केली. रमणसोबत असलेले सलमान खान (जाफरनगर), उमर शेख व फैजान यांनी राघवेंद्रला घेरले व मारहाण करण्यास सुरुवात केली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहताच त्यांना बाहेर काढण्यात आले. क्लबसमोरील रस्त्यावर हे सगळे जण हाणामारी करत होते. याची माहिती कुणीतरी पोलिसांना दिली. अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या सोनेगाव पोलीस ठाण्याचे गस्तीपथक घटनास्थळी पोहोचले.
पोलिसांनी सर्वांना थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना न जुमानता शिवीगाळ व हाणामारी सुरूच होती. यामुळे नागरिकांची गर्दी झाली होती. अखेर पोलिसांनी बळाचा वापर करत सर्वांना ताब्यात घेतले. राघवेंद्रने आपल्याला जाणुनबुजून दोन ते तीन वेळा धक्का दिला व शिवीगाळ केली असा दावा रमणने केला. पोलिसांनी सर्व आरोपींविरोधात केवळ सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था भंग केल्याचे कलम लावत गुन्हा दाखल केला.