विमानाच्या कबाडी स्कीममध्ये ९७ लाखांचा चुराडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 15:59 IST2020-12-15T15:58:31+5:302020-12-15T15:59:39+5:30
Nagpur News fraud विमानाच्या कबाडात चार महिन्यात दहापट रक्कम परत मिळेल, अशी थाप मारून हैदराबादच्या ठगबाजांनी नागपूरच्या व्यापाऱ्याला ९७ लाखांचा गंडा घातला.

विमानाच्या कबाडी स्कीममध्ये ९७ लाखांचा चुराडा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विमानाच्या कबाडात चार महिन्यात दहापट रक्कम परत मिळेल, अशी थाप मारून हैदराबादच्या ठगबाजांनी नागपूरच्या व्यापाऱ्याला ९७ लाखांचा गंडा घातला. दोन वर्षांपूर्वीपासून सुरू असलेल्या या बनवाबनवीची तक्रार मिळाल्यानंतर कळमना पोलिसांनी सोमवारी गुन्हा दाखल केला. सतीश रेड्डी आणि जयरामभाई मेघजी पटेल (रा. हैदराबाद) अशी आरोपींची नावे आहेत. ते हैदराबादचे रहिवासी आहेत.
त्यांनी दोन वर्षांपूर्वी येथील नेताजीनगरात राहणारे कांतीलाल मंगनलाल मकवाना (वय ४७) यांना गाठले. विमानाच्या कबाडी स्कीममध्ये रक्कम गुंतविल्यास ३ ते ४ महिन्यात ८ ते १० पट परतावा मिळतो, अशी थाप मारून थापेबाजीचे मृगजळ मकवाना यांना दाखवले. त्याला बळी पडून मकवाना यांनी जानेवारी २०१८ मध्ये आरोपींकडे ९७ लाख रुपये दिले. तीन ते चार महिन्यात परतावा देण्याची थाप मारणाऱ्या रेड्डी आणि पटेल या दोघांनी नंतर मकवाना यांना वेगवेगळी कारणे सांगून टाळणे सुरू केले. आता दोन वर्षे झालीत. आठ ते दहा पट परतावा सोडा, मुद्दल रक्कमही ते परत करायला तयार नसल्याने अखेर मकवाना यांनी कळमना पोलिसांकडे तक्रार नोंदवली. पोलिसांनी या प्रकरणात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. आरोपींचा शोध घेतला जात आहे.
----