नागपूर : महापालिकेच्या प्रवर्तन विभागातर्फे बुधवारी लक्ष्मीनगर, हनुमाननगर व आसीनगर झाेनमध्ये अतिक्रमणविराेधी कारवाई करण्यात आली. या कारवाईत मनपाच्या पथकाने फुटपाथवरील ९५ अतिक्रमणे हटविली. यादरम्यान अतिक्रमणधारकांकडून ९ हजार रुपये दंड वसूल करून ट्रकभर सामानही जप्त करण्यात आले.
लक्ष्मीनगर झाेनअंतर्गत आठ रस्ता चाैक ते खामला, त्रिमूर्तीनगर चाैकवरील फूटपाथवर लावलेल्या २८ दुकानांवर बुलडाेजर चालविण्यात आले. या वेळी एक ट्रक सामान जप्त करून दाेन हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. हनुमाननगर झाेनअंतर्गत तुकडाेजी पुतळा चाैकापासून क्रीडा चाैक, मेडिकल चाैक, अशाेक चाैकपर्यंत ३७ अतिक्रमणधारकांवर कारवाई करून ७ हजार रुपये दंड वसुली करण्यात आली. आसीनगर झाेनअंतर्गत इंदाेरा चाैक ते डाॅ. आंबेडकर हाॅस्पिटल, लाल गाेदाम चाैकापर्यंत फूटपाथवरील ३० अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली. मनपाचे प्रवर्तन विभागाचे उपायुक्त महेश माेराेणे व संबंधित झाेनच्या सहायक आयुक्तांच्या मार्गदर्शनात पथकाने ही कारवाई केली.
अमरावती राेडवर स्थिती जैसे थे
अमरावती राेडवर विद्यापीठ कॅम्पसपासून मारुती सेवा शाेरूमपर्यंत रस्त्याच्या दाेन्ही बाजूंना फर्निचर, खेळणी, भाजी आदींची दुकाने लागलेली असतात. त्यांच्याविराेधात नियमित कारवाई केली जाते. मात्र कारवाईनंतर स्थिती जैसे थे हाेते. रस्त्याच्या कडेला अजूनही दुकाने लागत असून कठाेर कारवाई हाेताना दिसत नाही.