९२३ सराफांचे अभिलेखे निबंधकांच्या ताब्यात

By Admin | Updated: December 23, 2014 00:34 IST2014-12-23T00:34:58+5:302014-12-23T00:34:58+5:30

सहनिबंधकांनी पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांच्या सावकाराकडील कर्जाची जुळवाजुळव चालविली आहे. त्यासाठी तब्बल ९२३ सावकार तथा सराफ व्यापाऱ्यांचे रेकॉर्ड ताब्यात घेऊन तपासणी सुरू करण्यात आली आहे.

9 23 in the custody of the Registrar of Saraf | ९२३ सराफांचे अभिलेखे निबंधकांच्या ताब्यात

९२३ सराफांचे अभिलेखे निबंधकांच्या ताब्यात

रेकॉर्डची तपासणी : पश्चिम विदर्भातील सावकारी कर्जाची जुळवाजुळव
राजेश निस्ताने - यवतमाळ
सहनिबंधकांनी पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांच्या सावकाराकडील कर्जाची जुळवाजुळव चालविली आहे. त्यासाठी तब्बल ९२३ सावकार तथा सराफ व्यापाऱ्यांचे रेकॉर्ड ताब्यात घेऊन तपासणी सुरू करण्यात आली आहे.
युती सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सावकाराकडील कर्जमाफीची घोषणा विधीमंडळात केली. यासंंबंधीचे स्पष्ट आदेश, निकष अद्याप जाहीर झालेले नाहीत. त्यासाठी आणखी किमान दोन आठवडे लागणार आहेत. परंतु सहकार प्रशासनाने या संभाव्य कर्जमाफीच्या दिशेने काम सुरू केले आहे. अमरावती महसूल विभागात एकूण ९२३ परवानाधारक सावकार आहेत. त्यात बहुतांश सावकार हे मनीलेंडर्स अर्थात सराफ व्यापारी आहेत. सोने-चांदीचे दागिने गहाण ठेऊन ते व्याजाने पैसा देतात. यातील सर्वाधिक ४३० परवानाधारक सावकार एकट्या अमरावती जिल्ह्यात आहेत.
अकोला १९६, बुलडाणा १५५, यवतमाळ १०१ तर वाशिम जिल्ह्यात ४१ सावकारांची नोंद आहे. या सर्व सावकारांचे कर्ज वाटपासंबंधीचे अभिलेखे सहायक निबंधकांनी ताब्यात घेतले आहेत. गेल्या वर्षभरात किती लोकांना कर्ज दिले, कुणी काय गहाण-तारण ठेवले, यातील शेतकरी किती, रक्कमा किती, व्याज दर किती आदी बाबींची तपासणी केली जात आहे. पाचही जिल्ह्यातील परवानाप्राप्त ९२३ सावकार तथा सराफा व्यावसायिकांनी गेल्या वर्षभरात तब्बल २२६ कोटी रुपयांच्या कर्जाचे वितरण केले असल्याची प्राथमिक माहिती आहे. यातील काही रक्कम ही व्यापारी, व्यावसायिकांची असण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी घेतलेल्या कर्जाचा नेमका आकडा किती याचा हिशेब जुळविला जात आहे. मात्र शेतकऱ्यांची कर्जमाफी २०० कोटींच्यावरच राहणार असल्याचे सांगितले जाते.
सराफ व्यापाऱ्यांची सारवासारव
शासनाने सावकाराकडील कर्जमाफीची घोषणा करताच पश्चिम विदर्भातील तमाम मनीलेंडर्स तथा सराफ व्यापाऱ्यांनी सारवासारव सुरू केली आहे. कर्जमाफीची रक्कम शासन या सावकाराला देणार असली तरी ती केव्हा मिळणार, त्याचे निकष काय राहणार, व्याज दर किती देणार याबाबत संभ्रम आहे. यामुळे शक्यतोवर कर्ज घेणारा शेतकरी दाखवायचाच नाही, अशी छुपी भूमिका अनेक सराफ व्यापाऱ्यांनी खासगीत घेतली आहे. कर्ज घेणारा हा शेतकरी अशी कोणतीही नोंद सावकाराकडे होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे सावकारी कर्ज शोधण्याचे आव्हान सहकार प्रशासनापुढे राहणार आहे.

Web Title: 9 23 in the custody of the Registrar of Saraf

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.