एकाच दिवसात ८७ निकाल

By Admin | Updated: July 3, 2015 03:02 IST2015-07-03T03:02:06+5:302015-07-03T03:02:06+5:30

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने अखेर निकाल लावण्यास सुरुवात केली आहे. गुरुवारी एकाच दिवसात विद्यापीठाने ८७ निकाल जाहीर केले.

87 results in one day | एकाच दिवसात ८७ निकाल

एकाच दिवसात ८७ निकाल

नागपूर विद्यापीठ : अंतिम वर्षाच्या अभ्यासक्रमांचादेखील समावेश
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने अखेर निकाल लावण्यास सुरुवात केली आहे. गुरुवारी एकाच दिवसात विद्यापीठाने ८७ निकाल जाहीर केले. यात बीए, बीकॉम, बीएस्सी या अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षांचा प्रामुख्याने समावेश आहे. कुलगुरूंनी आश्वासन दिल्यानंतरदेखील निकाल का जाहीर झाले नाही यासंदर्भात ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केल्यानंतर लागलीच निकाल जाहीर करण्यात आले.
शैक्षणिक सत्र सुरू झाले असले तरी उन्हाळी परीक्षांच्या निकालांची गाडी अतिशय संथ वेगाने सुरू आहे. मागील मंगळवारी यासंदर्भात परीक्षा विभागात बैठक झाली. अनेक महाविद्यालयांनी प्रात्यक्षिक परीक्षा व अंतर्गत मूल्यमापनाचे गुण विद्यापीठाला पाठविलेच नसल्याची बाब समोर आली. कमीतकमी अंतिम वर्षाचे निकाल परीक्षा विभागाने लवकरात लवकर लावावेत व ज्यांची प्रात्यक्षिक परीक्षा तसेच अंतर्गत मूल्यमापनाचे गुण आलेले नाहीत त्या महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांचे निकाल ‘विथहेल्ड’मध्ये ठेवून २-३ दिवसांत निकाल लावण्यात येतील, असे आश्वासन कुलगुरूंनी दिले होते. परंतु आठवडाभरानंतरदेखील निकाल न लागल्याने विद्यार्थी अस्वस्थ झाले होते. अखेर ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच प्रशासनाला जाग आली व एकाच दिवसात ८७ निकाल जाहीर करण्यात आले. विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षा ७ टप्प्यांत घेण्यात आल्या होत्या.
यातील पहिल्या ३ टप्प्यांचे निकाल १०० टक्के जाहीर करण्यात आले आहेत.(प्रतिनिधी)
निकाल लागला, गुणपत्रिका कुठे?
गुरुवारी निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांनी विद्यापीठाचे संकेतस्थळ उघडले व किती गुण मिळाले याची चाचपणी करु लागले. परंतु प्रत्येकच बाबीत काही ना काही घोळ करणाऱ्या विद्यापीठाने येथेदेखील आपली परंपरा कायम ठेवली. अनेक विद्यार्थ्यांना ‘आॅनलाईन’ गुणपत्रिकाच दिसत नव्हती. यासंदर्भात विद्यापीठातील अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता तांत्रिक अडचणींमुळे असे होत असल्याचे उत्तर मिळाले.
अद्याप ६१५ निकाल प्रलंबित
आतापर्यंत ९५६ अभ्यासक्रमांपैकी केवळ ३३७ निकाल जाहीर करण्यात आले आहेत. अजूनही ६१५ निकाल प्रलंबित आहेत. हे निकाल लवकरात लवकर जाहीर करण्याचे आमचे पूर्ण प्रयत्न राहतील. दररोज निकालांचा आढावा घेण्यात येईल, असे प्रतिपादन प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी केले.
महाविद्यालयांना पाठवावे लागणार ‘आॅनलाईन’ गुण
काही ठराविक महाविद्यालयांनी विद्यापीठाला प्रात्यक्षिक व अंतर्गत मूल्यमापनाचे गुण ‘आॅनलाईन’ प्रणालीने पाठविले नव्हते. त्यामुळे निकालांना विलंब झाला. परंतु पुढच्या वेळपासून महाविद्यालयांना वेळेत हे गुण पाठविणे अनिवार्य करण्यात येणार आहे. कुठल्याही महाविद्यालयाचे गुण प्रत्यक्ष स्वीकारले जाणार नाही. ते ‘आॅनलाईन’च पाठवावे लागतील असे प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी स्पष्ट केले.

Web Title: 87 results in one day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.