रेमडेसिवीरमुळे नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील ७७ टक्के रुग्ण बरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2020 07:00 IST2020-11-02T07:00:00+5:302020-11-02T07:00:07+5:30
Nagpur News corona नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) मेडिसीन विभागाने मागील काही दिवसात २७९८ बाधितांवरील उपचाराच्या झालेल्या एका अभ्यासात रेमडेसिवीरमुळे जवळपास ७७ टक्के रुग्णांचे प्राण वाचल्याचे पुढे आले आहे.

रेमडेसिवीरमुळे नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील ७७ टक्के रुग्ण बरे
सुमेध वाघमारे
नागपूर : रेमडेसिवीर इंजेक्शनमुळे कोरोनाबाधितांचा संसर्गाचा दिवस कमी न झाल्याचे व गंभीर आजारी असलेल्या रुग्णांचे प्राण वाचविण्यात हे औषध परिणामकारक नसल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) म्हटले आहे. परंतु मेडिकलच्या औषध वैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. प्रशांत पाटील यांच्या मार्गदर्शनात नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात रेमडेसिवीरमुळे जवळपास ७७ टक्के रुग्णांचे प्राण वाचल्याचे पुढे आले आहे.
नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) मेडिसीन विभागाने मागील काही दिवसात २७९८ बाधितांवरील उपचाराचा अभ्यास केला. यात ९५३ रुग्णांना फॅविपीरॅवीर, ७१० रुग्णांना रेमडेसिवीर, १४८ रुग्णांना रेमडेसिवीर व फॅविपीरॅवीर, ३२ रुग्णांना रेमडेसिवीर व टॉसिलीझूमॅब, ८ रुग्णांना रेमडेसिवीर, फॅविपीरॅवीर व टॉसिलीझूमॅब, ४० रुग्णांना टॉसिलीझूमॅब, ९ रुग्णांना प्लाझ्मा थेरपी तर ८९८ रुग्णांना रेमडेसिवीर व इतरही औषधे देण्यात आली होती.
-७१० रुग्णांमधून १६६ रुग्णांचा मृत्यू
मेडिसीन विभागाचा अभ्यासानुसार ७१०रुग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शन देण्यात आले. यातून ५४४ रुग्ण बरे होऊन त्यांना रुग्णालयातून ‘डिस्चार्ज’ देण्यात आले. १६६ रुग्णांचा मृत्यू झाले. मृत्यूचे प्रमाण २३.३८ टक्के आहे. डॉ. पाटील यांच्यानुसार मृतांमध्ये कोविड शिवाय, इतर जुने गंभीर आजार (कोमोरबिडीटी) होते. उदा. मधुमेह, रक्तदाब, अस्थमा, कर्करोग, श्वसनाचे विकार, मूत्रपिंडाचे आदी विकार होते.
-रेमडेसिवीरसोबत दिलेल्या इतर औषधांचाही फायदा
९५३ रुग्णांना देण्यात आलेल्या फॅविपीरॅवीर इंजेक्शनमुळे ८६३ रुग्ण बरे झाले. ९० रुग्णांचा मृत्यू झाला. या शिवाय, रेमडेसिवीर व फॅवीपिरॅवीर दिलेल्या १४८ रुग्णांमधून ११८ रुग्ण बरे तर ३० रुग्णांचा मृत्यू झाला. रेमडेसिवीर व टॉसिलीझूमॅब दिलेल्या ३२ रुग्णांमधून २३ रुग्ण बरे तर ९ रुग्णांचा मृत्यू झाला. रेमडेसिवीर, फॅवीपिरॅवीर व टॉसिलीझूमॅबम दिलेल्या ८ रुग्णांमधून ५ रुग्ण बरे तर ३ रुग्णांचा जीव गेला. टॉसिलीझूमॅब दिलेल्या ४० रुग्णांमधून २८ रुग्ण बरे तर १२ रुग्णांचा मृत्यू झाला. रेमडेसिवीरसह इतर औषधे दिलेल्या ८९८ रुग्णांमधून ६९० रुग्ण बरे झाले तर २०८ रुग्णांचा मृत्यू झाला. रेमडेसिवीरसोबत दिलेल्या इतर औषधांचाही काही प्रमाणात फायदा झाल्याचे दिसून आले.
-डॉ. प्रशांत पाटील
प्रमुख, मेडिसीन विभाग, मेडिकल