आॅनलाईन लोकमतनागपूर : शहरातील एका बड्या कंत्राटदाराला पुण्यातील त्रिकूटाने सिडनीत प्रदर्शन लावल्यास लाखो रुपये मिळतील, असे आमिष दाखवून ७० लाख रुपयांचा गंडा घातला. विलास शंकर बिरासदार, माधुरी विलास बिरासदार आणि अमोल श्रीकांत खरे, अशी आरोपींची नावे आहेत. ते पुण्यात अध्यात्मक भवनाजवळ राहतात.रेशीमबागमधील रहिवासी जयंत माधवराव खडतकर (वय ५५) हे कंत्राटदार आहेत. ते रस्त्याची कामे करतात. जून २०१४ मध्ये सक्करदऱ्यात त्यांची आरोपी बिरासदार दाम्पत्य आणि खरेसोबत ओळख झाली. आपण देश-विदेशात वेगवेगळे प्रदर्शन (एक्झीबिशन) लावतो, अशी माहिती त्यावेळी त्यांनी दिली. विदेशातील प्रदर्शनात बक्कळ पैसा मिळतो, असेही आरोपी म्हणाले. आपल्याला सिडनीत (आॅस्ट्रेलिया) रिअल इस्टेटसंबंधाने मोठे प्रदर्शन लावायचे आहे. त्यात खर्च खूप येणार असला तरी झटपट कोट्यवधींचा नफा मिळणार, असेही सांगितले. आरोपींच्या वर्तनातून त्यांच्यावर विश्वास बसल्यामुळे खडतकर यांनी जून २०१४ मध्ये त्यांना टप्प्याटप्प्याने ६९ लाख ५३ हजार ९०० रुपये दिले. त्यानंतर प्रदर्शनाची तयारी करतो, ही परवानगी मिळायची, ती परवानगी मिळायची आहे, असे सांगत तीनही आरोपी खडतकर यांना टाळू लागले. साडेतीन वर्षे झाली तरी त्यांनी सिडनीत प्रदर्शन काही लावले नाही. त्यांनी फसवणूक केल्याचे लक्षात आल्यामुळे खडतकर यांनी आरोपींना आपली रक्कम परत मागितली, मात्र त्यांनी संगनमत करून ही रक्कम वाटून घेतली.महिनाभर चौकशीआपली फसगत झाल्याची खात्री पटल्याने खडतकर यांनी महिनाभरापूर्वी सक्करदरा ठाण्यात तक्रार अर्ज दिला. पोलीस उपनिरीक्षक जगतनारायण तिवारी यांनी या प्रकरणाची प्रदीर्घ चौकशी केल्यानंतर सोमवारी सायंकाळी अहवाल दिला. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक डोळे यांनी उपरोक्त आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. आरोपींना अटक करण्यासाठी सक्करदरा पोलिसांचे पथक पुण्याकडे जाणार आहे.
सिडनीतील प्रदर्शनीच्या नावे नागपूरच्या कंत्राटदाराला ७० लाखांचा गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 00:13 IST
शहरातील एका बड्या कंत्राटदाराला पुण्यातील त्रिकूटाने सिडनीत प्रदर्शन लावल्यास लाखो रुपये मिळतील, असे आमिष दाखवून ७० लाख रुपयांचा गंडा घातला.
सिडनीतील प्रदर्शनीच्या नावे नागपूरच्या कंत्राटदाराला ७० लाखांचा गंडा
ठळक मुद्देपुण्यातील त्रिकूटाची बनवाबनवी