नागपूर : वयाच्या चाळीशीनंतर ४० टक्के लोक गुडघ्याच्या दुखण्याने त्रस्त असतात. याला बदललेली जीवनशैली, लठ्ठपणा आणि अयोग्य प्रकारे करण्यात येणारे व्यायाम ही काही कारणे आहेत. परंतु लॉकडाऊन दरम्यान अनेकांच्या शारीरिक हालचालींचा वेग मंदावला होता. यातच व्यायामाचा अभाव व प्रमाणाबाहेर आहार घेतल्याने वजन वाढल्याने आता गुडघेदुखीच्या तक्रारी घेऊन येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. ४० ते ६० वयोगटातील जवळपास ७० टक्के लोक या आजारावर उपचारासाठी येत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
लॉकडाऊनमध्ये इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सचा अतिवापर, बैठी जीवनशैली, वर्क फ्रॉम होम दरम्यान बसण्याच्या चुकीच्या सवयी याचे परिणाम आता दिसू लागले आहेत. घरात राहिल्याने पुरेसा सूर्यप्रकाश न मिळाल्याने शरीरात ‘ड जीवनसत्वा’ची कमतरता निर्माण झाली आहे. बैठी जीवनशैली आणि व्यायामाच्या अभावामुळे बऱ्याच लोकांचे वजन वाढले आहे. आता कोरोनाबाधितांची संख्या कमी झाल्याने लोक सकाळी व्यायाम करण्यासाठी घराबाहेर पडू लागले आहेत. परंतु वाढलेल्या वजनाचा गुडघ्यावर पडत असलेला अतिरिक्त भार यातच चुकीच्या व्यायाम यामुळे गुडघ्याच्या समस्या वाढल्या आहेत.
-१० पैकी ८ रुग्णांना गुडघेदुखी
प्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. संजीव चौधरी यांनी सांगितले, अनलॉकनंतर गुडघेदुखीची तक्रार घेऊन येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. १० पैकी जवळपास ८ रुग्ण हा त्रास घेऊन येत आहे. गुडघेदुखीच्या वेदना कमी करण्यासाठी दररोज योग्य व्यायाम करणे, वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी संतुलित आहार आवश्यक आहे.
काय काळजी घ्यावी?
- आहारात हिरव्या पालेभाज्या, दूध, फळे, बीट, सोयाबीन यांचा समावेश करावा.
- निरोगी आहार आणि व्यायामामुळे हाडे, स्नायू आणि सांधे मजबूत राहतात.
-दररोज किमान २० मिनिटे सूर्यप्रकाश मिळवा.
-‘जॉइंट रिप्लेसमेंट’ हा शेवटचा पर्याय, त्यासाठी डॉक्टरांचा सल्ला आवश्यक.
कोट...
गुडघ्याचे दुखणे कुठल्या भागात आहे आणि त्याची तीव्रता किती, याला घेऊन गुडघ्याचा आजाराचे निदान केले जाते. गुडघ्याचे दुखणे नेहमीच गंभीर राहत नाही. परंतु वेळीच उपचार न केल्यास ओस्टिओआर्थरायटिसमुळे जॉइटला नुकसान पोहचू शकते. गुडघ्याचे दुखणे वाढून अपंगत्वाचे कारणही ठरू शकते.
- डॉ. संजीव चौधरी, अस्थिरोगतज्ज्ञ