१४ दुचाकींसह ६.५१ लाखाचा ऐवज जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:08 IST2021-05-23T04:08:16+5:302021-05-23T04:08:16+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क कळमेश्वर : ग्रामीण भागात वाहन चाेरीचे प्रमाण वाढत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कळमेश्वर शहरात केलेल्या ...

१४ दुचाकींसह ६.५१ लाखाचा ऐवज जप्त
लाेकमत न्यूज नेटवर्क
कळमेश्वर : ग्रामीण भागात वाहन चाेरीचे प्रमाण वाढत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कळमेश्वर शहरात केलेल्या कारवाईमध्ये वाहन चाेरट्या दाेघांना अटक करीत एका विधिसंघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ६ लाख ५१ हजार रुपये किमतीच्या एकूण १४ माेटरसायकली जप्त केल्या. चाेरट्यांनी या सर्व माेटरसायकली विविध ठिकाणांहून चाेरून आणल्या असल्याचे पाेलिसांना सांगितले. ही कारवाई शुक्रवारी (दि. २१) रात्री करण्यात आली.
अटक करण्यात आलेल्या आराेपींमध्ये अविनाश ऊर्फ ओपन प्रभाकर उघडे (२४, रा. ब्राह्यणी, कळमेश्वर) व चरण रामदास निमावत (२७, रा. घाेराड, ता. कळमेश्वर) यांच्यासह एका विधिसंघर्षग्रस्त बालकाचा समावेश आहे. कळमेश्वर शहरातील विधिसंघर्षग्रस्त बालक वाहनचाेरी करीत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेतील पाेलीस अधिकाऱ्यांना मिळाली हाेती. त्यामुळे त्यांनी शिताफीने त्याला ताब्यात घेत विचारपूस केली. त्याने गुन्ह्यांची कबुली देत साथीदारांची नावेही सांगितली. त्याआधारे पाेलिसांनी त्या दाेघांनाही अटक केली.
त्यांच्याकडून ६ लाख ५१ हजार रुपये किमतीच्या एकूण १४ माेटरसायकली जप्त केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलीस निरीक्षक अनिल जिट्टावार यांनी दिली असून, त्यांच्याकडून वाहनचाेरीच्या आणखी काही घटना उघड हाेण्याची शक्यताही व्यक्त केली आहे. याप्रकरणी कळमेश्वर पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक राजीव कर्मलवार व जितेंद्र वैरागडे, उपनिरीक्षक नरेंद्र गौरखेडे, सहायक फौजदार जयप्रकाश शर्मा, गजेंद्र चौधरी, महेश जाधव, दुर्गाप्रसाद पारडे, राजेंद्र रेवतकर, रामा आडे, रोहन डाखोरे, महेश बिसने, अमृत किनगे, अमोल वाघ, अजिज दुधकनोज, अमोल कुथे यांच्या पथकाने केली.
....
बनावट चावीचा वापर
या माेटरसायकली विधिसंघर्षग्रस्त बालकाने चाेरून नेल्याने ताे या वाहनचाेरीचा मुख्य सूत्रधार आहे. त्या माेटरसायकली विकण्यासाठी त्याने अविनाश व चरण यांना दिल्या हाेत्या. हे दाेघेही त्याचे मित्र हाेत. त्याने या माेटरसायकली या नागपूर(ग्रामीण)मधील कळमेश्वर तर नागपूर शहरातील अंबाझरी, कळमना व पारडी पाेलीस ठाण्याच्या हद्दीतून चाेरून आणल्याचे पाेलिसांना सांगितले. माेटरसायकली चाेरण्यासाठी ताे बनावट चावीचा वापर करायचा.