६३ आॅटोरिक्षा जप्त

By Admin | Updated: July 13, 2014 01:01 IST2014-07-13T01:01:01+5:302014-07-13T01:01:01+5:30

प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने (आरटीओ) शनिवारी सुटीच्या दिवशीही आॅटो तपासणी मोहीम राबविण्यात आली. पूर्व नागपुरात राबविण्यात आलेल्या या विशेष मोहिमेत तब्बल ६३ आॅटोरिक्षे जप्त करण्यात आले.

63 autorickshaw seized | ६३ आॅटोरिक्षा जप्त

६३ आॅटोरिक्षा जप्त

सुटीच्या दिवशी आरटीओची कारवाई : आॅटोचालकांमध्ये दहशतीचे वातावरण
नागपूर : प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने (आरटीओ) शनिवारी सुटीच्या दिवशीही आॅटो तपासणी मोहीम राबविण्यात आली. पूर्व नागपुरात राबविण्यात आलेल्या या विशेष मोहिमेत तब्बल ६३ आॅटोरिक्षे जप्त करण्यात आले. यातील अनेकांचे परवाने ३० ते ६० दिवसांसाठी निलंबित केले. या भागात पहिल्यांदाच झालेल्या एवढ्या मोठ्या कारवाईमुळे आॅटोचालकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.
पूर्व उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, शहर व ग्रामीण आरटीओची ही संयुक्त कारवाई होती. आरटीओच्या चार वायू पथकाने ही कामगिरी यशस्वी केली. कारवाईची माहिती देताना उपप्रादेशिक परिवहन अधिकारी (शहर) विजय चव्हाण म्हणाले, शहरात १७ हजार १४९ आॅटोरिक्षे आहेत. यातील फक्त ९ हजार २५५ आॅटोरिक्षांना परमीट आहे. उर्वरित आॅटोरिक्षे खासगी आहेत. मात्र हे आॅटोरिक्षे पहाटे किंवा रात्रीच्या वेळी प्रवासी वाहतूक करीत असल्याच्या तक्रारी होत्या. आरटीओची आतापर्यंत कारवाई ही दिवसा होत होती. यातच पश्चिम आणि मध्य नागपुरापर्यंत ही कारवाई मर्यादित असायची. यामुळे अनेकांना पूर्व व दक्षिण नागपुरात कारवाई होत नसल्याचा गैरसमज झाला होता. मनुष्यबळ कमी असल्याने दुसरा शनिवार कार्यालयीन सुटीचा दिवस निवडण्यात आला. दहा कार्यालयीन लिपिक व मोटार वाहन निरीक्षक आणि सहायक निरीक्षकांच्या मदतीने सकाळी ८.३० वाजतापासून कारवाईला सुरुवात झाली. फक्त आॅटोरिक्षांवर लक्ष केंद्रित करण्यात आल्याने आणि एकाच वेळी चारही पथकांकडून कारवाई सुरू झाल्याने ६३ खासगी आॅटो जप्त करण्यात यश मिळाले. या मोहिमेत कार्यालयीन लिपिकांचीही मदत घेण्यात आली. यातील काहींचे ३० दिवसांसाठी तर काहींचे ६० दिवसांसाठी परवाने निलंबित करण्यात आले आहे. ही कारवाई प्रादेशिक परिवहन अधिकारी (शहर) सर्जेराव शेळके यांच्या मार्गदर्शनात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण आणि पूर्वचे रवींद्र भुयार यांच्या नेतृत्वात करण्यात आली. (प्रतिनिधी)
अपंगही चालवीत होते आॅटोरिक्षा
आरटीओच्या या कारवाईत अपंगही आॅटोरिक्षा चालवीत असल्याचे उघडकीस आले. विशेष म्हणजे, चौकाचौकात वाहतूक पोलीस असतानाही त्यांच्यासमोरून हे आॅटोचालक प्रवासी घेऊन रहदारी करीत होते. एका आॅटोचालकाने छातीत दुखण्याचा बहाणा करीत आॅटो सोडून देण्याची विनंती केली. आरटीओच्या चमूने त्याचा आॅटो ताब्यात घेऊन मेयोत नेले. तेथील डॉक्टरांनी लगेच त्याला तपासून काहीच झाले नसल्याचे सांगितले.

Web Title: 63 autorickshaw seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.