६२ बसेस जप्त करून दिली मुदत
By Admin | Updated: August 4, 2015 03:21 IST2015-08-04T03:21:23+5:302015-08-04T03:21:23+5:30
सामान्य वाहतूकदाराचे प्रवासी कर थकीत असल्यास प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) संबंधित वाहन तत्काळ

६२ बसेस जप्त करून दिली मुदत
आरटीओची कुचराई का : ७.९३ कोटीचा थकीत कर कधी मिळणार?
नागपूर : सामान्य वाहतूकदाराचे प्रवासी कर थकीत असल्यास प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) संबंधित वाहन तत्काळ जप्त करते, दंड भरल्यावरच वाहन सोडते. मात्र वंश निमयच्या स्टार बसने २००७ पासून प्रवासी कर भरलेला नाही. ७ कोटी ९३ लाखांचा कर थकलेला असतानाही मुदतीवर मुदत दिली जात आहे. आरटीओची ही कुचराई का, आरटीओने सुटीच्या दिवशी नादुरुस्त असलेल्या ६२ बसेसवर कारवाई करून काय साध्य केले, असे प्रश्न उपस्थित केले जात आहे.
आरटीओच्या नियमानुसार ३.५ टक्के प्रवासी कर, तसेच बाल पालनपोषण कर देणे बंधनकारक असते. २००७ मध्ये वंश निमयने २५ बससाठी सात लाख रु पये भरले होते. मात्र गेल्या आठ वर्षांत वंश निमयने आरटीओला एक रु पयाही दिला नाही. राज्य शासनाच्या नियमाचे हे उल्लंघन असल्याची जाणीव आरटीओला होताच ९ जुलै रोजी महापालिकेला नोटीस बजावली. १३ जुलैपर्यंत ७ कोटी ९३ लाख रु पये न भरल्यास बससेवा बंद करण्याचा इशाराही दिला. या संदर्भात महापालिकेने वंश निमयला नोटीस बजावली. थकीत रक्कम भरण्याचे निर्देश दिले.
कर भरण्याची जबाबदारी आॅपरेटरची
कर न भरल्याने परिवहन विभागाने वंश निमय कंपनीच्या नादुरुस्त ६२ बसेस जप्त केल्या आहेत. ही रक्कम बस आॅपरेटरला भरावीच लागणार आहे. खासगी कंपनीच्या नादुरुस्त बसेस जप्त केल्याने याचा शहरातील वाहतुकीवर कोणताही परिणाम होणार नाही.
-प्रवीण दटके, महापौर, मनपा
जप्त बसेस मनपाच्या नाही
मोटार वाहन कायद्यानुसार कर न भरल्याने परिवहन विभागातर्फे वंश निमय कंपनीच्या नादुरुस्त ६२ बसेस जप्त करण्यात आल्या आहेत. त्या रस्त्यावर धावत नव्हत्या. त्यामुळे याचा वाहतुकीवर कोणताही परिणाम होणार नाही. याचा मनपा प्रशासनाशी कोणताही संबंध नाही. हा कर भरण्याची जबाबदारी संबंधित कंपनीची आहे. या संदर्भात त्यांना सूचना केली आहे.
संजय काकडे, उपायुक्त, मनपा