कोविड रुग्णालयांना ६१.५ मेट्रिक टन ऑक्सिजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:07 IST2021-04-17T04:07:24+5:302021-04-17T04:07:24+5:30

जिल्हा प्रशासनाचा पुढाकार रुग्णालय प्रतिनिधी, ऑक्सिजन पुरवठादार यांची संयुक्त बैठक ऑक्सिजन पुरवठ्याचे नियोजन जाहीर हॉस्पिटलनिहाय ऑक्सिजन वाटप लोकमत न्यूज ...

61.5 MT of oxygen to Kovid Hospital | कोविड रुग्णालयांना ६१.५ मेट्रिक टन ऑक्सिजन

कोविड रुग्णालयांना ६१.५ मेट्रिक टन ऑक्सिजन

जिल्हा प्रशासनाचा पुढाकार

रुग्णालय प्रतिनिधी, ऑक्सिजन पुरवठादार यांची संयुक्त बैठक

ऑक्सिजन पुरवठ्याचे नियोजन जाहीर

हॉस्पिटलनिहाय ऑक्सिजन वाटप

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : जिल्ह्यातील सर्व डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल व खासगी रुग्णालयांना ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत व अविरत मिळण्यासाठी ऑक्सिजन पुरवठ्याचे जिल्हा प्रशासनातर्फे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील शासकीय व खासगी डेडिकेटेड ११ कोविड हॉस्पिटल यांना ६१.५ मेट्रिक टन लिक्विड ऑक्सिजन तर शहर व ग्रामीण भागातील १७० खासगी रुग्णालयांना सुमारे ८,६२२ जम्बो सिलिंडर उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी शुक्रवारी दिली. संबंधित रुग्णालयांनी त्यांना निश्चित केलेल्या वितरकांकडून ऑक्सिजनचा पुरवठा प्राप्त करून घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

कोविड रुग्णांना ऑक्सिजनअभावी उपचारामध्ये बाधा निर्माण होणार नाही, यासाठी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी ऑक्सिजन निर्माते, वितरक, शासकीय व खासगी कोविड हॉस्पिटलचे प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक घेऊन यापुढे सर्व डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा निश्चित केला असून, त्यानुसार वितरणाचे धोरण जाहीर केले आहे.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त पी. एम. बल्लाळ, सतीश चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी अविनाश कातडे आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्यात तसेच शहरात कोविड-१९ ने संक्रमित रुग्णांवर उपचार करण्यासाठी डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल, कोविड हेल्थ सेंटर तसेच खासगी रुग्णालयांना मान्यता देण्यात आली आहे. या रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत व अविरत असणे अत्यंत गरजेचे आहे. कोविड हॉस्पिटलमध्ये अपुऱ्या ऑक्सिजनमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी ऑक्सिजन वितरणाचे धोरण निश्चित केले आहे. त्यानुसार कोविड रुग्णांवर उपचार करणाऱ्या सर्व शासकीय व खासगी रुग्णालयासाठी ऑक्सिजन साठा, सिलिंडरचे वितरण रिफिल, डिस्ट्रिब्युटर यांच्यामार्फत पुरवठा करण्यात येणार आहे. त्यामुळे ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होण्यास मदत होईल.

तक्रारीसाठी नियंत्रण कक्ष

ऑक्सिजन पुरवठ्यासंदर्भात हॉस्पिटलनिहाय नियोजन करण्यात आले आहे. या नियोजनानुसार वितरकांकडून थेट रुग्णालयांना पुरवठा होणार आहे. ऑक्सिजन पुरवठ्यासंदर्भात असलेल्या तक्रारी सोडविण्यासाठी महानगरपालिका क्षेत्र व ग्रामीण भागासाठी स्वतंत्र नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले आहे. नागपूर महानगरपालिका क्षेत्रासाठी नियंत्रण कक्ष दूरध्वनी क्रमांक ०७१२-२५६७०२१ तर ग्रामीण भागासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष दूरध्वनी क्रमांक ०७१२-२५६२६६८ शुक्रवारपासून कार्यान्वित झाले आहे.

Web Title: 61.5 MT of oxygen to Kovid Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.