कोचिंग क्लासकडून ६० पालकांना ७६ लाखांचा गंडा, ‘एफआयआयटी-जेईई’ चेअरमनविरोधात गुन्हा दाखल
By योगेश पांडे | Updated: March 3, 2025 23:21 IST2025-03-03T23:20:57+5:302025-03-03T23:21:10+5:30
तक्रारीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गोयलविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोचिंग क्लासकडून ६० पालकांना ७६ लाखांचा गंडा, ‘एफआयआयटी-जेईई’ चेअरमनविरोधात गुन्हा दाखल
योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : विद्यार्थ्यांच्या पालकांकडून भरमसाठ पैसे घेऊनदेखील अचानक अर्ध्यातूनच कोचिंग सेंटर बंद करणाऱ्या ‘एफआयआयटी-जेईई’च्या चेअरमनविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ६० पालकांचे कोचिंग क्लासेसने ७६ लाख रुपये बुडविले. कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
‘एफआयआयटी-जेईई’ने देशातील अनेक कोचिंग सेंटर्स अचानक बंद केले व त्यामुळे हजारो विद्यार्थी आणि पालक आर्थिक परिस्थितीत सापडले. तेथील प्राध्यापक व व्यवस्थापनात वेतन न मिळाल्यामुळे वाद झाला होता. त्यानंतर मोठ्या प्रमाणात प्राध्यापकांनी राजीनामे दिले. चिंताग्रस्त पालकांनी दिल्ली आणि नोएडामध्ये तक्रारी दाखल केल्या व गुन्हा दाखल करण्यात आला. अचानक कोचिंग सेंटर्सच बंद पडल्याने विद्यार्थ्यांना महत्त्वाच्या अभियांत्रिकी प्रवेश परीक्षांची तयारी करताना पर्यायी कोचिंग पर्याय शोधण्यासाठी धावपळ करावी लागली. नागपुरातील निलेश प्रेमनारायण खंडेलवाल (४८, मस्कासाथ, इतवारी) व इतर ५९ पालकांनी कोतवाली पोलीस ठाण्यात ‘एफआयआयटी-जेईई’चा चेअरमन डी.के.गोयल ( सर्वेप्रिया विहार, नवी दिल्ली) याच्याविरोधात तक्रार केली. या पालकांनी जुने नंदनवन येथील सेंटरवर मुलांना कोचिंग क्लासेस लावले होते. दोन वर्षांचे शुल्क म्हणून ७६.७५ लाख रुपये भरले होते. मात्र १ जानेवारी रोजी अचानक ‘एफआयआयटी-जेईई’चे कोचिंग सेंटर बंद झाले. त्यानंतर कुणीच योग्य उत्तर देत नव्हते. या तक्रारीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गोयलविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अगोदरच गोठविले आहेत ११.११ कोटी
कोचिंग इन्स्टिट्यूट अचानक बंद करण्याच्या चौकशीचा भाग म्हणून नोएडा पोलिसांनी ‘फीटजी’चे संस्थापक दिनेश गोयल याच्याशी संबंधित १२ खात्यांतील ११.११ कोटी रुपये गोठविले आहेत. दिल्ली पोलिसांनी ३१ माजी शिक्षक आणि २५० पालकांचे जबाब नोंदविले आहेत. दरम्यान मागील वर्षी जून महिन्यात नागपुरात पालक ‘एफआयआयटी-जेईई’विरोधात रस्त्यावर उतरले होते. शेकडो पालक आणि विद्यार्थ्यांनी वेस्ट हायकोर्ट रोडवरील लॉ कॉलेज स्क्वेअरजवळील कोचिंग सेंटरसमोर निदर्शने केली होती.