६ मूकबधिर बालकांचे श्रवणदोष होणार दूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:08 IST2021-07-17T04:08:32+5:302021-07-17T04:08:32+5:30
नागपूर : इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) जन्मत: मूकबधिर असलेल्या ६ बालकांवर शुक्रवारी यशस्वीरीत्या ‘कॉक्लिअर इम्प्लांट’ ...

६ मूकबधिर बालकांचे श्रवणदोष होणार दूर
नागपूर : इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) जन्मत: मूकबधिर असलेल्या ६ बालकांवर शुक्रवारी यशस्वीरीत्या ‘कॉक्लिअर इम्प्लांट’ शस्त्रक्रिया करण्यात आली. यामुळे या बालकांचे लवकरच श्रवणदोष दूर होऊन ते बोलायलाही शिकणार आहेत. मेयोमध्ये आतापर्यंत ४४ बालकांवर ही शस्त्रक्रिया झाली.
जन्मजात श्रवणदोषावर ‘कॉक्लिअर इम्प्लांट’ हा अद्ययावत पर्याय आहे; परंतु यावरील खर्च अनेकांच्या आवाक्याबाहेर असतो. अशा गरजू बालकांसाठी मेयोच्या ‘कान, नाक, घसा (ईएनटी) विभाग आशेचे केंद्र ठरले आहे. विभागाचे प्रमुख डॉ. जीवन वेदी यांच्या पुढाकाराने २०१७मध्ये ‘कॉक्लिअर इम्प्लांट’ला सुरुवात केली. आवश्यक उपकरण मिळताच शस्त्रक्रिया होत होत्या; परंतु मागील दीड वर्षापासून कोरोनाच्या प्रादुर्भावाने शस्त्रक्रिया थांबविण्यात आल्या होत्या; परंतु आता कोरोना नियंत्रणात येताच पुन्हा एकदा या शस्त्रक्रियेला सुरुवात झाली. यामुळे जन्मत: असलेला बहिरेपणा दूर होऊन बोलणे देखील शक्य झाले आहे.
शुक्रवारी झालेल्या ६ बालकांवरील ‘कॉक्लिअर इम्प्लांट’ शस्त्रक्रिया डॉ. वेदी व बधिरीकरण तज्ज्ञ डॉ. वैशाली शेलगावकर यांच्या मार्गदर्शनात डॉ. विपीन इखार, डॉ. शीतल दलाल यांच्यासह वरिष्ठ व इतर निवासी डॉक्टर व परिचारिका यांच्या सहकार्याने करण्यात आली. बालकांमध्ये भंडारा, पुसद, छत्तीसगड, नागपूर व भंडारा येथील रुग्ण होते.सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉ. वेदी यांनी सांगितले.